कोल्हापूर – कोल्हापूर नदी प्रदूषणमुक्तीसाठी शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी इचलकरंजी येथील ‘वेस्टर्न महाराष्ट्र प्रोसेस असोसिएशन’च्या पदाधिकार्यांशी चर्चा करून अडचणी समजावून घेतल्या. खासदार माने यांच्या रुईकर वसाहतीतील निवासस्थानी ही बैठक झाली. प्रोसेस युनिट असणार्या कारखानदारांनी ‘झिरो डिस्चार्ज’च्या दृष्टीने पाऊल उचलावे, म्हणजे पंचगंगा नदीत प्रोसेस युनिटच्या माध्यमातून जाणारे प्रदूषित पाणी पूर्णपणे थांबेल, असे आवाहन श्री. माने यांनी याप्रसंगी केले.
खासदारांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत प्रोसेसर्स असोसिएशनने ‘सर्व प्रोसेस युनिटच्या झिरो डिस्चार्जच्या दृष्टीने कार्यवाही करू’, असे आश्वासन दिले. या वेळी मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्यासमवेत लवकरच असोसिएशनच्या पदाधिकार्यांची बैठक घेऊन या उद्योगधंद्याचे प्रश्न सोडवणार असल्याचे खासदार धैर्यशील माने यांनी सांगितले. या वेळी महाराष्ट्र असोसिएशनचे अध्यक्ष गिरीराज मोहता, लक्ष्मीकांत मर्दा, संदीप मोघे, संदीप साळगावकर, श्रीनिवास बोहरा, अजित डाके, विजय मोठे, राजेश सावंत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.