प्रसिद्धीपत्रकांमध्ये मराठीचा वापर बंधनकारक करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू !

मनसेची पश्‍चिम रेल्वे प्रशासनाला चेतावणी

यापूर्वी राज्यशासनाने रेल्वे प्रशासनाला मराठी भाषेचा उपयोग करण्याविषयी वारंवार सूचना दिल्या आहेत. असे असतांना त्याकडे दुर्लक्ष करणे, हा रेल्वे प्रशासनाचा उद्दामपणा म्हणावा कि मराठीद्वेष ?

मुंबई, २७ डिसेंबर (वार्ता.) – पश्‍चिम रेल्वेचा बहुतांश भाग मुंबईमध्ये येत असूनही स्थानिक मराठी भाषेचा वापर केला जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष आहे. याची आम्ही गंभीर नोंद घेतली आहे. तातडीने प्रसिद्ध होत असलेली माहितीपत्रके, विज्ञापने, तसेच सामाजिक प्रसारमाध्यमे यांमध्ये मराठी भाषेचा उपयोग बंधनकारक करण्यात यावा. अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, अशी चेतावणी महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी पश्‍चिम रेल्वे प्रशासनाला पत्राद्वारे दिली आहे.

 (सौजन्य : News18 Lokmat)

या पत्रामध्ये नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी लिहिले आहे, ‘केंद्रशासनाच्या त्रिभाषा सूत्रानुसार पत्रके, विज्ञापने यांमध्ये राज्याची भाषाही वापरणे बंधनकारक आहे; परंतु पश्‍चिम रेल्वे प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मराठी भाषेचा उपयोग करण्याविषयी आम्ही आग्रही आहोत. पश्‍चिम रेल्वे प्रशासन मात्र याची नोंद घेत नाही. रेल्वेचे अधिकारी अद्यापही उद्दामपणा करत आहेत. आंदोलन झाल्यास त्याचे सर्वतोपरी दायित्व रेल्वे प्रशासनाचे राहील. आपला सकारात्मक प्रतिसाद अपेक्षित आहे.’ विशेष म्हणजे मागील मासात महाराष्ट्र शासनाकडूनही रेल्वे प्रशासनाला पत्र पाठवून केंद्रशासनाच्या त्रिभाषा सूत्रानुसार कामकाजामध्ये मराठी भाषेचा उपयोग करण्याविषयी कळवण्यात आले आहे. मराठी भाषेचा उपयोग न केल्यास शासनाकडून कारवाईची चेतावणीही देण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी ‘अ‍ॅमेझॉन’च्या ‘अ‍ॅप’मध्ये मराठी भाषेचा उपयोग करावा, यासाठी मनसेने आंदोलन केले होते. प्रारंभी ‘अ‍ॅमेझॉन’ याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मनसेकडून आक्रमक पवित्रा घेतला. मुंबई आणि पुणे येथील ‘अ‍ॅमेझॉन’च्या काही कार्यालयांची तोडफोड केली. त्यानंतर ‘अ‍ॅमेझॉन’कडून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे क्षमायाचना करून ‘अ‍ॅप’मध्ये मराठी भाषेचा उपयोग करण्याची सिद्धता दर्शवण्यात आली आहे.