‘वेब सिरीज’च्या माध्यमातून हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्यावर आघात करणार्‍यांना दंड मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही ! – अधिवक्ता खुश खंडेलवाल

‘आश्रम’ या ‘वेब सिरीज’चे निर्माते प्रकाश झा अन् अभिनेते बॉबी देओल यांना जोधपूर न्यायालयाकडून नोटीस

अधिवक्ता खुश खंडेलवाल

मुंबई – सध्या हिंदु धर्म, देवता, संत आणि संस्कृती यांच्यावर वेब सिरीजच्या माध्यमातून आघात केला जात आहे. आम्ही हिंदू न्यायप्रक्रिया आणि प्रशासकीय व्यवस्था यांवर विश्‍वास ठेवतो; म्हणूनच कायद्याच्या मार्गाने हिंदी चित्रपटसृष्टीच्या विरोधात लढत आहोत. जोपर्यंत यातील दोषींना त्यांच्या अपराधांचा दंड मिळत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशी प्रतिक्रिया अधिवक्ता खुश खंडेलवाल यांनी व्यक्त केली आहे. ‘आश्रम’ या ‘वेब सिरीज’च्या माध्यमातून हिंदु साधू-संत यांचे केलेले अवमानकारक चित्रण आणि हिंदु धर्माची झालेली अपकीर्ती याप्रकरणी अधिवक्ता खुश खंडेलवाल यांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेनंतर १४ डिसेंबरला जोधपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाकडून ‘आश्रम’ ‘वेब सिरीज’चे निर्माते प्रकाश झा अन् अभिनेते बॉबी देओल यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या वेळी खंडेलवाल यांनी आपले मत व्यक्त केले. याप्रकरणी पुढील सुनावणी ११ जानेवारी या दिवशी होणार आहे.

अधिवक्ता खुश खंडेलवाल यांनी ‘आश्रम’ या ‘वेब सिरीज’ प्रकरणी आतापर्यंत केलेल्या तक्रारी आणि दिलेला न्यायालयीन लढा यांविषयीचा घटनाक्रम

२२ ऑक्टोबर २०२० : भा.दं.वि. कलम १५३ (अ) आणि २९५ (अ) यानुसार संबंधितांवर गुन्हा नोंद करण्याची मागणी करत जोधपूर येथील ‘कुडी भगतासनी’ या पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट

३ नोव्हेंबर २०२० : हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या आणि दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण केल्याच्या प्रकरणी तक्रारीच्या मागणीसाठी जोधपूर येथील अपर मुख्य महानगर मॅजिस्ट्रेट (संख्या १) येथे फौजदारी तक्रार प्रविष्ट

१७ नोव्हेंबर २०२० : जोधपूर येथील अपर मुख्य महानगर मॅजिस्ट्रेट (संख्या १) कडून तक्रार प्रविष्ट करून घेण्यास नकार; मात्र पुढील सुनावणीसाठी प्रकरण राखून ठेवले.

१४ डिसेंबर २०२० : जिल्हा आणि सत्र न्यायालय, जोधपूर यांच्याकडे revision petition (याचिका) प्रविष्ट, त्यानुसार ‘वेब सिरीज’चे निर्माते प्रकाश झा आणि अभिनेते बॉबी देओल यांना न्यायालयाने याप्रकरणी नोटीस पाठवली. पुढील सुनावणी ११ जानेवारी २०२१ या दिवशी होईल, असे जाहीर केले.