सकल हिंदु समाजाचे भुसावळच्या प्रांत अधिकार्यांना निवेदन

भुसावळ (जि. जळगाव) – खडका रोड येथील मुकेश गुंजाळ यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात ९ मार्चला छत्रपती शिवाजी महाराजांची शोभायात्रा काढण्यासाठी रितसर अनुमती मागितली; मात्र गेल्या ३०-४० वर्षांपासून ही शोभायात्रा ठरलेल्या मार्गाने काढली जात असतांना, यंदा बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ यांनी नेहमीच्या मार्गाने यात्रा न काढता पारंपरिक मार्ग पालटण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देऊनही राहुल वाघ यांनी सदरची मिरवणूक ही खडकारोड येथे अडवली आणि त्यांच्या पदाचा अपवापर करून सदरची मिरणवणूक बंद केली, तसेच सदरची शोभायात्रा नेहमीच्या मार्गाने काढण्यास कुठल्याही समाजाची हरकत नव्हती, असे असतांनाही ही शोभायात्रा थांबवून तिला परत पाठवून दिल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा एकप्रकारे अपमान झाला आहे, तसेच समस्त शिवप्रेमी यांच्यावर एक प्रकारे अन्यायच झाला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सकल हिंदु समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. (अशी मागणी का करावी लागते ? – संपादक) या मागणीचे निवेदन भुसावळच्या प्रांत अधिकार्यांना देण्यात आले. यामध्ये गौतम जाधव, रवींद्र बाविस्कर, वैभव गुंजाळ, अमोल पाटील आदींसह २२ जणांच्या स्वाक्षर्या निवेदनासोबत जोडल्या आहेत.
संपादकीय भूमिका :छत्रपती शिवरायांची शोभायात्रा महाराष्ट्रात अडवली जाणे, हे पोलिसांना लज्जास्पद ! |