भाजपचे नेते विजय चौथाईवाले यांनी घेतली नेपाळच्या पंतप्रधानांची भेट !

काठमांडू (नेपाळ) – भाजपच्या परराष्ट्र विभागाचे प्रमुख विजय चौथाईवाले यांनी नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांची भेट घेतली. या भेटीत सध्याची राजकीय परिस्थितीती आणि दोन्ही देशांतील संबंध यांवर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. या भेटीविषयी चौथाईवाले यांनी ट्वीट करून सांगितले की, नेपाळ कम्युनिस्ट पक्षाचे नेते आणि अर्थमंत्री विष्णु पौडेल यांच्या आमंत्रणावरून नेपाळचा दौरा केला. नेपाळचे पंतप्रधानांसमवेतही भेट झाली. नेपाळचे चीनशी असलेले जवळचे संबंध पहाता मागील मासामध्ये भारताचे सैन्यदलप्रमुख मनोज मुकुंद नरवणे, त्यापूर्वी रॉचे प्रमुख सुमंतकुमार गोयल, परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रुंगला आदींनीही नेपाळचा दौरा करून ओली यांची भेट घेतली होती. नेपाळमध्ये सध्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षातील गटबाजी वाढली आहे. एक गट ओली यांच्यासमवेत असून दुसरा गट पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ यांच्यासमवेत आहे.

विजय चौथाईवाले त्यांच्या देखरेखीतच वर्ष २०१९ मध्ये अमेरिकेच्या ह्युस्टनमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या ‘हाऊडी मोदी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विजय चौथाईवाले हे शास्त्रज्ञ असून ते पूर्वी टोरंट आस्थापनामध्ये काम करत होते. वर्ष २०१४ मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला.