श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने महापौर आणि पालिका आयुक्त यांना निवेदन
अशी मागणी संघटनांना का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून का करत नाही ? कि त्यांनाही असेच अपेक्षित आहे, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?
सोलापूर – येथील महानगरपालिकेच्या धर्मवीर संभाजी तलाव आणि सावरकर मैदान यांच्या नावात तातडीने सुधारणा करावी, अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सोलापूर विभागाच्या वतीने ८ डिसेंबर या दिवशी निवेदनाद्वारे करण्यात आली. याविषयीचे निवेदन महापौर श्रीकांचना यन्नम आणि महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांना श्री शिवप्रतिष्ठानच्या धारकर्यांनी दिले.
या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सोलापूर विभागाचे सर्वश्री आनंद मुसळे, ओंकार देशमुख, अभिषेक इंगळे, लक्ष्मीकांत बिद्री, रमेश दळवी, नागनाथ पल्लोलू, योगीनाथ फुलारी, ऋषीकेष धारकाशिवकर, आदित्य कारकल, प्रशांत जमखंडी, अमित शिंदे आदी धारकरी उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की,
१. येथील तलावाचे नाव ‘धर्मवीर संभाजी तलाव’, असे आहे; मात्र या तलावाचे नाव ‘धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज तलाव’, असे असणे अपेक्षित आहे. केवळ धर्मवीर संभाजी तलाव या नावात धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचा उल्लेख नकळत एकेरी होतो. त्यामुळे या तलावाच्या नावात तातडीने सुधारणा करून ‘धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज तलाव’, असे नामकरण करण्यात यावे.
२. गोल्डफिंच पेठ परिसरातील मैदानाचे नाव सध्या ‘सावरकर मैदान’, असे आहे. या नावातही सुधारणा करून या मैदानाचे नाव ‘हिंदुसंघटक स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर मैदान’, असे ठेवावे.