पेठभाग, सराफकट्टा, हरभट रस्ता येथील वाहनतळ समस्या सोडण्यासाठी उपाययोजना करा ! – भाजपच्या वतीने महापालिका प्रशासनास निवेदन

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून समस्यांकडे लक्ष देऊन कृती का करत नाही ?

उपायुक्त राहुल रोकडे (उजवीकडे) यांना निवेदन देतांना भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते

सांगली, १० डिसेंबर (वार्ता.) – शहरातील मध्यवर्ती असलेल्या पेठभाग, सराफकट्टा, हरभट रस्ता, मारुति रस्ता, मेन रोड या रस्त्यांवर दिवसेंदिवस वाहनतळ समस्या गंभीर होत आहे. तरी येथील वाहनतळ समस्या सोडवण्यासाठी तात्काळ उपाययोजना करावी, या मागणीसाठी भाजपच्या वतीने सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले. आयुक्तांच्या नावे असलेले निवेदन उपायुक्त राहुल रोकडे यांनी स्वीकारले. या वेळी भाजप उपाध्यक्ष श्री. विशाल पवार, प्रसिद्धीप्रमुख श्री. केदार खाडिलकर, सर्वश्री प्रकाश बिरजे, प्रशांत चिपळुणकर, भारती दिगडे, उर्मिला बेलवलकर यांसह अन्य उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, भावे नाट्यमंदिर समोरचे महापालिकेचे असलेले वाहनतळ हे दुचाकी वाहनांसाठी खुले करावे. आनंद चित्रमंदिराच्या मागील जागा चारचाकी वाहनांसाठी खुली करावी. गणपति मंदिराशेजारी असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया कार्यालयालाही त्यांचा वाहनतळ खुला करण्यास सांगावा. या उपाययोजना राबवल्यावर वाहनतळ समस्येवरील ताण थोडा अल्प होईल.