सातारा येथील राजवाडा बसस्थानकातील ‘शिव-समर्थ’ शिल्पाला छावा क्षात्रवीर सेना आणि वंचित बहुजन आघाडी यांचा विरोध

सातारा, ७ डिसेंबर (वार्ता.) – येथील राजवाडा बसस्थानकात स्थानिक नगरसेवक विजयकुमार काटवटे यांच्या प्रयत्नातून आणि प्रशासनाच्या माध्यमातून ‘शिव-समर्थ’ शिल्प साकारले जात आहे. शिव-समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीतच काही संघटनांनी ‘समर्थ रामदासस्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु नव्हते’, असा अपप्रचार चालू केला आहे. या संघटनांनी हे शिल्प हटवण्याचा पवित्रा घेतला असून याविषयीचे निवेदन सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एस्.टी. महामंडळ प्रशासन यांना देण्यात आले आहे.

शहरातील छावा क्षात्रवीर सेना आणि वंचित बहुजन आघाडी या शिवद्रोही संघटनांनी या शिल्पाला विरोध दर्शवला आहे. या संघटनांचे म्हणणे आहे की, राजवाडा बसस्थानक परिसरात उभारण्यात येणारे समर्थ रामदासस्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिल्प चुकीचे आहे. त्यांची भेट झाल्याचे कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत. तरीही प्रशासनाकडून हा प्रसंग भिंतीवर लावून समाजावर खोटा इतिहास लादण्याचा प्रयत्न चालू आहे. हे चित्र हटवण्यात आले नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन उभे करण्यात येईल, अशी चेतावणी देण्यात आली आहे.

सत्य कितीही झाकले, तरी ते लपून रहात नाही ! – विजयकुमार काटवटे, नगरसेवक, भाजप

याविषयी नगरसेवक विजयकुमार काटवटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रसंत समर्थ रामदासस्वामी यांच्या चरणस्पर्शाने पुनीत झालेले सातारा हे ऐतिहासिक नगर आहे; मात्र याच नगरीत ‘शिव-समर्थां’च्या शिल्पाला काही संघटनांकडून होणारा विरोध दुर्दैवी म्हणावा लागेल. हे शिल्प साकारण्यासाठी प्रारंभीपासूनच अनुमतींचे अडथळे निर्माण करण्यात आले; मात्र ते अडथळे पार करत आज हे शिल्प साकार झाले आहे. आता शहरातील पुरोगामी आणि परिवर्तनवादी संघटना यांनी या शिल्पाला विरोध दर्शवला आहे. लोकशाहीमध्ये सर्वांना आपले मत प्रदर्शित करण्याचा अधिकार आहे; मात्र इतिहासात पुरावे उपलब्ध असतांना ‘शिव-समर्थांची भेट झालीच नाही’, असे म्हणणे म्हणजे सत्य नाकारण्यासारखेच आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी समर्थांना विरोध केला असता, तर श्रीक्षेत्र सज्जनगड उभे राहिले नसते. काही वर्षांपूर्वी सज्जनगड येथील श्रीसमर्थ रामदासस्वामी संस्थानच्या वतीने ‘श्री शिवछत्रपती-समर्थ योग’ या नावाचा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी समर्थ रामदासस्वामी, तसेच त्यांचे शिष्य यांना दिलेल्या सनदा आणि पत्रव्यवहार आदी प्रसिद्ध करण्यात आले आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज श्रीमंत शिवाजीराजे भोसले, श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले, समर्थ विचारांचे गाढे अभ्यासक आप्पासाहेब धर्माधिकारी, समर्थवंशज सूर्याची गवालक्ष स्वामी यांची प्रस्तावना नमूद करण्यात आली आहे; मात्र या सर्वांकडे तथाकथित पुरोगामी आणि परिवर्तनवादी संघटना दुर्लक्ष करत आहेत. सत्य कितीही झाकले, तरी ते लपून रहात नाही. या निमित्ताने मी समस्त शिवभक्तांना विनंती करतो की, आपण सर्वांनी संघटित होऊन या प्रसंगाला सामोरे जाऊया.