कोरोना नियमांचा भंग करणाऱ्यांना कोविड सेंटर मध्ये काम करण्याची शिक्षा द्या ! – गुजरात उच्च न्यायालय

केवळ मास्कच नव्हे, तर सार्वजनिक ठिकाणी पाळायच्या सर्व नियमांचे उल्लंघन केल्यासाठी अशाच प्रकारची शिक्षा आता बंधनकारकच करणे आवश्यक आहे. दंड स्वरूपात पैसे भरल्याने सुटका करून घेतल्याने लोकांमध्ये शिस्त येत नसल्याने अशी शिक्षा करणेच आता अपरिहार्य ठरते !

कर्णावती (गुजरात) – जे लोक कोरोना नियमांचा भंग करत आहेत, त्यांना कमीत कमी ५ ते अधिकाधिक १५ दिवसांसाठी कोणत्याही कोविड सेंटरमध्ये सेवा बजावण्याची शिक्षा करण्यात यावी. दिवसांतून ४-५ घंटे त्यांच्याकडून काम करून घेण्यात यावे, असा आदेश गुजरात उच्च न्यायालयाने गुजरात सरकारला दिला आहे.

‘स्वच्छता, जेवण बनवणे, साहाय्य करणे, सेवा करणे, इतर कामे, त्याचसमवेत माहिती संकलित करण्याची कामे करून घ्या’, असेही न्यायालयाने म्हटले आहे. ही शिक्षा नियमभंग करणार्‍या व्यक्तीचे वय, पात्रता, लिंग यांनुसार ठरवली जाणार आहे. यासंदर्भातील कार्य अहवाल २४ डिसेंबरपर्यंत सादर करण्याचा आदेशही उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. विशाल अवतणी यांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.