पणजी, २८ नोव्हेंबर – नुकतेच कुळे, धारबांदोडा येथे ‘लव्ह जिहाद’ प्रकरण उघडकीस आले आहे. कुळे, धारबांदोडा येथील हिंदु युवतीने ‘लव्ह जिहाद’ची शिकार झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे. गोव्यात ‘लव्ह जिहाद’विषयी अनेक प्रकरणे यापूर्वी झालेली आहेत. या पार्श्वभूमीवर ‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी गोव्यात ‘धर्मांतरबंदी कायदा’ कायदा लागू करून त्याची कठोरपणे कार्यवाही करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
काही दिवसांपूर्वी फरिदाबाद (हरियाणा) येथील निकिता तोमर या युवतीच्या हत्येनंतर देशभरात ‘लव्ह जिहाद’विषयी पुन्हा चर्चा चालू झाली आहे. उत्तरप्रदेश सरकारने नुकताच ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात अध्यादेश पारित केला आहे. उत्तरप्रदेश राज्याच्या पाठोपाठ हरियाणा, आसाम, कर्नाटक आणि मध्यप्रदेश या राज्यांनी ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा करणार असल्याचे घोषित केले आहे. केवळ हिंदुत्वनिष्ठ संघटनाच नव्हे, तर अनेक शिख आणि ख्रिस्ती संघटनांनी ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात आवाज उठवला आहे.
कुळे, धारबांदोडा येथील संशयित नवाझ साब देसाई याने दहावी इयत्तेत शिकणार्या एका हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून सलग ५ वर्षे विवाहाचे आमीष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. हे अतिशय गंभीर असून गोव्यात ‘लव्ह जिहाद’चे षड्यंत्र रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करणे आवश्यक आहे. या संदर्भात समितीने पुढील मागण्या केल्या आहेत
१. ‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी गोव्यात ‘धर्मांतरबंदी कायदा’ करावा.
२. सामाजिक ऐक्याच्या गोंडस नावाखाली ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन, तसेच प्रसार करणार्या जाहिराती, चित्रपट, नाटके, पुस्तके, लेख, भाषणे आदींवर कायदेशीर कारवाई करावी.
३. ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे हाताळण्यासाठी वा त्यांचा शोध घेण्यासाठी केंद्र आणि राज्य स्तरांवर पोलिसांची विशेष शाखा स्थापन करावी.
४. कोणत्याही आंतरधर्मीय विवाहाची नोंदणी ही केवळ न्यायालयातच केली जावी.
५. मदरसे आणि मशिदी यांमधून अशा प्रकारच्या धर्मांतराला प्रोत्साहन दिले जाते, असे आढळून आल्यास संबंधित मदरसे आणि मशिदी यांच्यावर तात्काळ बंदी घालण्यात यावी.