दुसर्‍या दिवशी शेतकर्‍यांचे देहलीच्या सीमेवर आंदोलन

शेतकर्‍यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधुराचा वापर

नवी देहली – केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात हरियाणा आणि पंजाब राज्यांतील शेतकर्‍यांनी ‘चलो देहली’ आंदोलन चालू केले आहे; मात्र त्यांना देहलीच्या सीमेवरच रोखण्यात आले आहे. त्यामुळे या सीमेवर सैन्य छावणीचे स्वरूप आले आहे. २७ नोव्हेंबरला सकाळी सिंघु सीमेवर जमलेल्या शेतकर्‍यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. दुपारनंतर देहली पोलिसांनी अखेर या शेतकर्‍यांना देहलीतील बुराडी येथील मैदानात आंदोलन करण्याची अनुमती दिली.

केंद्र सरकारने ३ महत्त्वाची कृषी विधेयके संमत केली आहेत. याद्वारे शेतकरी दलालमुक्त होऊन त्याचा माल थेट बाजारात विकला जाऊ शकतो, असे सरकारचे म्हणणे आहे, तर शेतकर्‍यांना भीती वाटते की, त्यामुळे एम्.एस्.पी. (मिनिमम सपोर्ट प्राईज) रहित होऊन शेती खासगी आस्थापनांच्या कह्यात जाईल. त्यामुळे शेतकर्‍यांनी ‘एम्.एस्.पी.ची व्यवस्था कायम राहील, ही हमी कायद्यात समाविष्ट करा’, अशी  मागणी केली आहे.