एक सेल्फी (स्वतःच स्वतःचे काढलेले छायाचित्र) सांगली-पेठ रस्त्यावरील खड्ड्यांसमवेत काढा !- सतीश साखळकर, नागरिक विकास मंच

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांची होणारी असुविधा लक्षात घेऊन प्रशासनाने त्वरित रस्त्यांचे काम करावे, अशी जनतेची अपेक्षा आहे !

सांगली – खासदार सुप्रिया सुळे यांचा तीन वर्षांपूर्वीचा ‘सेल्फी विथ खड्डा’ (रस्त्यावरील खड्ड्यांसमवेत स्वतःचे छायाचित्र) हा राजकीय टोलेबाजीचा कार्यक्रम चांगलाच गाजला होता. महाराष्ट्रातील प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समवेत त्या स्वतःचे छायाचित्र काढून सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित करत होत्या. त्याचा चांगला परिणाम झाला होता आणि अनेक खड्डे बुजवले गेले होते. त्या वेळी भाजपची सत्ता होती. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाकाराने शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेवर आहे. हाच मुद्दा पकडून येथील नागरिक विकास मंचच्या सतीश साखळकर यांनी सुप्रिया सुळे यांना निवेदन पाठवले आहे. एक सेल्फी सांगली-पेठ रस्त्यावरील खड्ड्यांसमवेत काढा. या रस्त्याच्या पाहणीसाठी दौरा करा’, असे आवाहन साखळकर यांनी केले आहे.