सोलापूर – भाजपच्या काळात तिन्ही वीज आस्थापनांचा कारभार उत्तम चालला होता, तसेच स्वस्त दरात वीज खरेदी केली जात होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात विजेच्या प्रश्नांचा खेळखंडोबा झाला आहे. विजेचा वापर न करता सावकारी पद्धतीने जनतेकडून चौपट वीजदेयक वसुली केली जात आहे. कोरोना उपचारांसाठी असलेली रुग्णालये, तसेच वैद्यकीय देयकांचे प्रश्न सुटले नाहीत. याचा परिणाम पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत दिसून येईल, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. २४ नोव्हेंबर या दिवशी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ‘हेरिटेज लॉन’ येथे भाजपच्या वतीने बैठक आयोजित केली होती. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी महापौर श्रीकांचना यन्नम, भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार विजय देशमुख, आमदार सुभाष देशमुख यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.