हुतात्मा सैनिक संग्राम पाटील यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात निगवे खालसा (कोल्हापूर) येथे अंत्यसंस्कार

हवेत बंदुकीच्या ३ फैरी झाडून पोलीस आणि सैन्य यांची मानवंदना

हुतात्मा सैनिक संग्राम पाटील यांना मानवंदना देतांना कोल्हापूर जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर – हुतात्मा सैनिक संग्राम पाटील यांच्या पार्थिवावर २३ नोव्हेंबर या दिवशी निगवे खालसा येथे पोलीस आणि ८ सैनिकांच्या तुकडीने बंदुकीच्या हवेत ३ फैरी झाडून, तसेच अंतिम बिगुल वाजवून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हुतात्मा सैनिक संग्राम पाटील यांचा मुलगा शौर्य याच्या हस्ते अग्नी देण्यात आला. पालकमंत्री तथा माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलीक, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार पी.एन्. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली. या वेळी अधिकारी, पदाधिकारी त्याचबरोबर सैन्याचे विविध आजी, माजी अधिकारी आणि सहस्रोंच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

हुतात्मा सैनिक संग्राम पाटील यांना अग्नी देतांना मुलगा शौर्य

हुतात्मा सैनिक संग्राम पाटील यांचे पार्थिव आज सकाळी ६.३० च्या सुमारास कोल्हापूरहून निगवे खालसाकडे नेण्यात येत असतांना, या मार्गावरील गावांकडून रस्त्याच्या दुर्तफा रांगोळी काढण्यात आली होती. ठिकठिकाणी श्रद्धांजलीचे फलक लावण्यात आले होते. ग्रामस्थांकडून पुष्प वाहून आदरांजली वाहण्यात येत होती. निगवे खालसा येथील निवासस्थानी त्यांचे पार्थिव काही काळ अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. याठिकाणी कुटुंबीय आणि नातेवाइक यांनी त्यांचे दर्शन घेतले. यानंतर या ठिकाणाहून अंत्ययात्रेला प्रारंभ झाला. ग्रामस्थ, विद्यार्थी-विद्यार्थिनी पुष्पहार आणि फूले वाहून आदरांजली वहात होते. अमर रहे अमर रहे संग्राम पाटील अमर रहे, भारतमाता की जय, वन्दे मातरम्, पाकिस्तान मुर्दाबाद, अशा घोषणा देत ही अंत्ययात्रा अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आली.

हुतात्मा सैनिक संग्राम पाटील यांना हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देतांना पोलीस आणि सैनिक

याठिकाणी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, सरपंच पांडुरंग महाडेश्‍वर, माजी आमदार के.पी. पाटील, अमल महाडिक यांनी पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली. सैन्यदलाच्या वतीने सुभेदार मेजर भाऊ तांबे, हुतात्मा सैनिकाचे वडील शिवाजी पाटील, बंधू संदीप, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रदीप ढोले, कर्नल शिवाजी बाबर, शिवाजी पवार, कर्नल विजय गायकवाड, सुभेदार संतोष कोकणे, सुभेदार अनिल देसाई, सुभेदार जयसिंग देशमुख, सुभेदार सीताराम दळवी, सुभेदार नारायण नरवडे, कर्नल डी.एस्. नागेश आणि आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीनेही पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहण्यात आली.

खासदार श्री. मंडलीक, पालकमंत्री श्री. पाटील यांनी या वेळी शोकसंदेश व्यक्त करून आदरांजली वाहिली. राज्यशासन निश्‍चितपणे हुताम्या सैनिकांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आधार देण्यासाठी उभे आहे. तरुणांना प्रेरणा देण्यासाठी हुतात्मा सैनिक संग्राम पाटील यांचा स्मृती स्तंभ उभा करावा, अशा शब्दांत पालकमंत्र्यांनी स्वत:च्या भावना व्यक्त केल्या.