फेसबूक ‘पोस्ट’वरून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचे प्रकरण
हे छायाचित्र छापण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक
पणजी, २२ नोव्हेंबर (वार्ता.) – पणजी येथील व्ही.एम्. साळगावकर कायदा महाविद्यालयाच्या पुरो(अधो)गामी साहाय्यक प्राध्यापिका शिल्पा सिंह यांनी २१ एप्रिल २०२० या दिवशी ‘मंगळसूत्र घातलेली महिला पाहिल्यावर गळ्यात साखळी असलेला कुत्रा दिसतो, तर हिजाब किंवा बुरखा घातलेली महिला झाकलेले ‘इलेक्ट्रॉनिक’ उपकरण दिसते’, अशी आक्षेपार्ह पोस्ट तिच्या ‘फेसबूक’ खात्यावरून प्रसारित केली होती.
या प्रकरणी प्राध्यापिका शिल्पा सिंह यांनी हिंदूंच्या धार्मिक भावना पायदळी तुडवल्या आहेत आणि त्यांच्या विरोधात प्रथमदर्शनी अहवाल (एफ्.आय.आर्.) नोंद करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करणारी तक्रार ‘राष्ट्रीय हिंदु युवा वाहिनी’चे राजीव झा यांनी रायबंदर येथील पोलिसांच्या ‘सायबर’ विभागाकडे ३० ऑक्टोबर या दिवशी प्रविष्ट केली होती.
(सौजन्य : prime media goa)
या तक्रारीवरून साहाय्यक प्राध्यापिका शिल्पा सिंह यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी भारतीय दंड संहितेचे कलम २९५ अंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे. या पार्श्वभूमीवर एका राष्ट्रीय हिंदी वृत्तवाहिनीवरून ‘माझ्यावर बलात्कार करण्याची आणि मला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली’, अशी तक्रार प्राध्यापिका शिल्पा सिंह यांनी गोवा पोलिसांकडे यापूर्वी केली होती आणि सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती. यावर गोवा पोलीस महासंचालक मुकेश कुमार मीना यांनी प्राध्यापिका शिल्पा सिंह यांना अपेक्षित सुरक्षा पुरवणार असल्याची ग्वाही दिली आहे. गोवा पोलीस महासंचालक मुकेश कुमार मीना यांनी नुकताच पणजी येथे प्रसारमाध्यमांशी मुक्त संवाद साधला. या वेळी पत्रकाराने विचारलेल्या एका प्रश्नाला गोवा पोलीस महासंचालक मुकेश कुमार मीना उत्तर देत होते.
पोलीस महासंचालक मुकेश कुमार मीना पुढे म्हणाले, ‘‘या प्रकरणी संबंधित सर्व व्यक्तींशी आम्ही चर्चा करणार आहोत आणि प्राध्यापिका शिल्पा सिंह यांना सुरक्षाही पुरवली जाणार आहे.’’