१. भारताच्या विरोधात चीनने पाकिस्तानचे साहाय्य घेणे, हे चीनला कमीपणा आणणारे !
‘पाकिस्तान आणि चीन एकमेकांना साहाय्य करत आहेत. काही दिवसांपूर्वी पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या ‘स्कारडू’ हवाईतळावर चीनची काही लढाऊ विमाने उतरली होती. चीनकडे अनेक हवाईतळे असतांना त्याने पाकिस्तानच्या स्कारडू हवाईतळाचा वापर करण्यामागे भारताशी मानसिक युद्ध करणे, हे एक कारण आहे. चीनचे तिबेटमध्ये अनेक हवाईतळ असून ते १२ सहस्र फूट ते १४ सहस्र फूट उंचीवर आहेत. जेव्हा १२ ते १४ सहस्र उंचीवरून एखादे विमान उडते, तेव्हा त्याची तांत्रिक क्षमता ५० ते ६० टक्क्यांनी न्यून होते. त्या तुलनेत पाकिस्तानचे स्कारडू हवाईतळ हे ७ सहस्र फूट उंचीवर आहे. त्यामुळे त्याचा वापर करणे चीनला सोयीचे वाटत असावे. तो भारताशी लढू शकत नाही; म्हणून त्याला पाकिस्तानचे साहाय्य घ्यावे लागत आहे. चीनला हे न्यूनपणा आणणारे आहे. चीनने पाकिस्तानचे साहाय्य घेतले, तरी काळजी करण्याचे कारण नाही; कारण पाकिस्तानचे स्कारडू आणि लडाख समोर असलेल्या हवाईतळांवर भारताचे पूर्ण लक्ष आहे.
२. भारताच्या जुन्या मिग विमानाने पाकचे अत्याधुनिक एफ्-१६ विमान पाडणे
पाकिस्तानी सैन्याशी कसे लढायचे, हे भारतीय सैन्याला चांगले ठाऊक आहे. वर्ष २०१९ मध्ये जेव्हा भारतीय वायूदलाने बालाकोटवर आक्रमण केले, तेव्हा पाकचे सैनिक भारतीय विमानांचा पाठलागही करू शकले नाहीत. या आक्रमणाच्या वेळी लढाऊ विमानांची ‘डॉक फाईट’ झाली, तेव्हा भारताच्या जुन्या मिग विमानाने पाकिस्तानच्या तुलनात्मकदृष्ट्या अत्याधुनिक एफ्-१६ विमानाला पाडले होते. त्यामुळे अशा प्रकारच्या आक्रमणांची भारताने काळजी करू नये. भारत त्याचे रक्षण करण्यासाठी समर्थ आहे.
३. चीनने पाकिस्तानचे साहाय्य घेणे, हा चीनचा ‘मानसिक युद्धा’चा प्रकार !
काही दिवसांपूर्वी चिनी माध्यमांमध्ये वृत्त आले की, चीन पाक सैन्याचे साहाय्य घेत आहे. काश्मीरमध्ये आतंकवादी कारवाया वाढवण्यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील आहे; परंतु त्यात त्याला यश मिळत नाही. भारतीय सैन्याने पाकिस्तानी नियंत्रण रेषेवर अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे भारतीय सैन्यदलाकडून ९५ टक्के आतंकवादी घुसखोर सीमेवरच मारले जात आहेत. पाकिस्तानी सैनिक चिनी सैन्याच्या साहाय्यासाठी लडाखमध्ये रहात असेल, तर त्याचा भारतावर विशेष परिणाम होणार नाही. याकडे चीनचा आणखी एक मानसिक युद्धाचा प्रकार म्हणून पाहिले पाहिजे.
४. पाकिस्तानने ५० टक्के सैन्याचा वापर जनतेच्या विरोधात करणे
भारत-पाक सीमा ही ३ सहस्र १४७ किलोमीटर लांब आहे. पूर्वी पाकिस्तानचे ८५ टक्के सैन्य भारत-पाक सीमेवरच तैनात केले जायचे; परंतु आता त्यांचे ५० टक्के सैन्य हे त्यांच्या देशांतर्गत चालू असलेली दुफळी दडपण्यासाठी वापरले जात आहे. यासाठी पाकचे सैन्य त्यांचे तोफखाने, हेलिकॉप्टर गनशिप, एअरक्राफ्ट, ड्रोन्स या शस्त्रांचा वापर त्यांच्याच जनतेच्या विरोधात करत आहे.
५. ‘इथिनिक’ (वांशिक) विविधतेमुळे असंघटित झालेला पाकिस्तान !
अ. पाकिस्तानमध्ये ‘इथिनिक’ (वांशिक) विविधता आहे. पाकिस्तानच्या पश्तुन, पंजाब, सिंध आणि बलुचिस्तान प्रदेशातील लोकांचा धर्म एक असला, तरी त्यांना एकमेकांविषयी कोणतीही आत्मीयता नाही. बलुचिस्तानी लोकांचा पंजाबच्या लोकांशी फारसा संबंध नाही. सिंधमधील लोकांची भाषा सिंधी आहे. त्यांचा पंजाबशी कोणताही संबंध नाही. त्याचप्रमाणे ‘फाटा’ (फेडरली अॅड्मिनिस्ट्रेडेड ट्रायबल एरिया) येथील जनतेचा संबंध सीमेपलीकडील अफगाणिस्तानशी अधिक आहे. इराणशी लागून असलेल्या भागात शियापंथीय लोकांचे विशेष प्रमाण आहे. पाकमध्ये २० टक्के असलेल्या शियांची इराणशी जवळीक आहे; कारण इराण शियादेश आहे. थोडक्यात पाक एक असंघटित देश आहे.
आ. बलुचिस्तानी लोकांना भारत अधिक प्रिय आहे, तर सिंधमधील लोक भारताकडून साहाय्याची अपेक्षा ठेवतात. धार्मिकदृष्ट्या पाहिले, तर पाकिस्तानातील ९७ टक्के लोकसंख्या मुसलमान आहे. त्यात सुन्नी ७७ टक्के असून शिया २० टक्के आहे. उर्वरित ३ टक्क्यांमध्ये हिंदू, शीख, ख्रिस्ती आणि अन्य आहेत. पाकिस्तानमध्ये शिया आणि सुन्नी यांच्यात संघर्ष चालू आहे. ‘शिया पंथियांच्या काही गटांना इराण साहाय्य करतो’, असे पाकिस्तानला वाटते.
६. भारताने काश्मीरमधील पाक आतंकवाद्यांचे कंबरडे मोडणे
अ. पाकिस्तानच्या आतंकवादी गटांची ३ भागांमध्ये विभागणी होऊ शकते. एक अल्-कायदा, तालिबान, इसिस आदी संघटनांचा आंतरराष्ट्रीय गट आहे, ते दुसर्या देशांमध्ये आतंकवादी कारवाया करतात. त्यामुळे कोणत्याही देशात आतंकवादी आक्रमण झाले, तर त्याचे मूळ नेहमी पाकिस्तानातच असते.
आ. दुसरा आतंकवादी गट हा लष्कर-ए-तोएबा, जैश-ए-लष्कर आणि हिजबूल मुजाहिदिन यांचा आहे. पाकिस्तान त्यांचा वापर भारतामध्ये आतंकवादी कारवाया करण्यासाठी करतो. या संघटनांचे भारताने काश्मीरमध्ये चांगलेच कंबरडे मोडले आहे. आज लेह-लडाखमध्ये आणि काश्मीरमध्ये एकही आतंकवादी नाही. जे आतंकवादी आहेत, ते सर्व काश्मीर खोर्यातील काही भागामध्ये आहेत. त्या ठिकाणी अनुमाने १०० ते १५० आतंकवादी असावेत.
इ. तिसरा गट आहे तो म्हणजे ‘तेहरिक तालिबान पाकिस्तान’ हा आतंकवादी गट पाकिस्तानच्या विरोधात आहे, तर तालिबानचा हक्कानी गट हा पाकिस्तानच्या बाजूने आहे.
ई. आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्या युद्धातही पाकिस्तानचे काही आतंकवादी पाठवण्यात आले आहेत. एवढेच नाही, तर बलुचिस्तानला मुक्त करण्यासाठी लढणारे विविध फुटीरतावादी गट आहेत, तेही पाकिस्तानच्या विरोधात आहेत. त्यामुळे पाकिस्तानच्या विरोधात असलेली संख्या पुष्कळ आहे.
७. पाकिस्तानी सैन्याचे तालिबानीकरण
‘पाकिस्तानचे तालिबानीकरण’ हा वाक्प्रचार नेहमी होतो. वर्ष १९७९ मध्ये सोव्हिएत युनियनने अफगाणिस्तानमध्ये पाय ठेवला, तेव्हा अफगाणिस्तानमधून सोव्हिएत युनियनला बाहेर करण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानचा वापर केला. त्या वेळी अमेरिकेने पाकिस्तानी आतंंकवाद्यांना साहाय्य केले. त्यात पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आयएस्आय’ आणि पाकिस्तानी लष्कर यांचा सहभाग १०० टक्के होता. तेव्हापासून ‘आयएस्आय’ आणि पाकिस्तानचे लष्कर यांचे तालिबानशी घनिष्ट संबंध आहेत. आज पाकिस्तान त्याच्याच जाळ्यात अडकला आहे.
तेव्हा तालिबानचा वापर सोव्हिएत युनियनच्या विरोधात करण्यात आला. आता पाक सैन्याचेच तालिबानीकरण झाले आहे.
८. पाकिस्तानमध्ये भारतापेक्षा आतंकवादाचे प्रमाण १० पट अधिक !
पाकिस्तानमध्ये आतंकवादामुळे हिंसाचार माजला आहे. आतंकवादामुळे पाकिस्तानमध्ये वर्ष २०११ ते २०१९ या कालावधीत ९ सहस्र ६२०, म्हणजे अनुमाने १० सहस्र नागरिक मारले गेले. सुरक्षारक्षक अनुमाने ३ सहस्र ४४३ ठार झाले. यासमवेतच ठार झालेल्या विविध आतंकवाद्यांची संख्या अनुमाने २० सहस्र एवढी आहे, म्हणजे पाकिस्तानमध्ये आतंकवादामुळे एकूण ३३ सहस्र जण ठार झाले आहेत. भारताची लोकसंख्या पाकिस्तानच्या ६ पट अधिक आहे. भारतात आतंकवादामुळे प्रतिवर्षी ५०० ते ६०० लोक ठार होतात. याचा अर्थ पाकिस्तानमध्ये भारताहून १० पट अधिक आतंकवाद आहे.’
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे