|
पणजी – राज्यात नरकारसुर प्रतिमा बनवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. या नरकासुर प्रतिमा बनवण्यासाठी प्रभागातील ‘नरकासुर डॅडी’ (स्थानिक लोकप्रतिनिधी बहुतेक ठिकाणी नरकासुर प्रतिमा बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर देणगी देत असतात.) लक्षावधी रुपये मुलांना देत असतात. यामुळे पैशांची उधळपट्टी होत आहे. यामध्ये पालट करून पैशांचा योग्य विनियोग करणे आवश्यक आहे, असे मत व्यवसायाने वास्तूविशारद असलेले तालुला डिसिल्वा यांनी व्यक्त केले आहे.
तालुला डिसिल्वा पुढे म्हणतात, ‘‘यंदा दीपावलीला आम्ही एका प्रभागात भेट दिली असता तेथील ‘नरकासुर डॅडी’ने मुलांना सर्वांत मोठी नरकासुर प्रतिमा बनवण्यासाठी एक लाख रुपये देणगी दिल्याचे ध्यानात आले. अशाच प्रकारे लहान नरकासुर प्रतिमा बनवण्यासाठी या ‘नरकासुर डॅडी’ने २० सहस्र रुपयांची देणगी दिली होती. आम्ही शहर आणि गावागावात मिळून एकूण नरकासुर प्रतिमांचा अभ्यास केला असता स्थानिक ‘नरकासुर डॅडी’ नरकासुर प्रतिमा बनवण्यासाठी प्रतिवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करत असल्याचे लक्षात आले. वास्तविक नरकासुर प्रतिमा बनवण्यासाठी कापड, रद्दी कागद, जुन्या सिमेंटच्या पिशव्या, पेंट, कागद आदी अल्प खर्चाच्या वस्तूंचा वापर होत असतो; मात्र दीपावलीच्या पूर्वसंध्येवर नरकासुर प्रतिमा बनवतांना प्रतिदिन बिर्याणी, शितपेय आदींची पार्टी होत असते. वास्तविक ‘नरकासुर डॅडी’ने हे पैसे समाज कल्याण, मुलांसाठी सुरक्षा आणि शिक्षण यांवर खर्च करणे आवश्यक आहे. मुलांना लहान वयात देणगी देऊन भ्रष्टाचार का शिकवला जात आहे ? देणगी न दिल्यास मुलांच्या अधिकाराचे हनन होणार आहे का ? हे पैसे शिक्षण, युवकांना रोजगार देणे, सामूहिक कृषी लागवड करणे, आरोग्य रक्षण, क्रीडा सुविधांमध्ये सुधारणा करणे आदींवर खर्च केल्यास योग्य झाले असते. या देणगीचा शेवटी प्रतिमादहन करून धूर होत असतो. हा पालट करण्याची आणि मुलांना योग्य ते देण्याची आता वेळ आली आहे.’’