जम्मू-काश्मीरमध्ये टोल नाक्यावरील चकमकीत ४ आतंकवादी ठार

जोपर्यंत आतंकवाद्यांचा कारखाना असणार्‍या पाकला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत काश्मीरमध्ये अशा चकमकी होऊन आतंकवादी ठार होत रहाणार आणि नवीन आतंकवादी निर्माण होत रहाणार !

नगरोटा (जम्मू-काश्मीर) – येथे १९ नोव्हेंबरच्या पहाटे बान टोल नाक्यावर आलेल्या एका ट्रकमधून आतंकवाद्यांनी सुरक्षादलांवर गोळीबार केला. या वेळी ३ घंटे झालेल्या चकमकीत ४ आतंकवादी ठार झाले. सुरक्षादलांनी हा ट्रकच आग लावून जाळून टाकला. त्यामुळे हे आतंकवादी पळू लागल्यावर त्यांना ठार करण्यात आले.

तसेच २ पोलीस घायाळ झाले. गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीवरून येथे वाहनांची तपासणी चालू असतांना ही घटना घडली. यानंतरही आता येथील सर्व वाहनांची तपासणी केली जात आहे. तसेच जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद करण्यात आला आहे. ठार करण्यात आलेले आतंकवादी ट्रकद्वारे जम्मू-श्रीनगर मार्गाने काश्मीरला जात होते. त्यांच्याकडून ११ एके-४७ रायफल, ३ पिस्तुले, २९ ग्रेनेडसह मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.