गांधी आणि नेहरू यांनी घेतलेल्या राष्ट्रघातकी निर्णयांची फळे आजही संपूर्ण देश भोगत असतांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मुक्ताफळे !
सातारा, १८ नोव्हेंबर (वार्ता.) – भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या राष्ट्राचा अत्यंत दूरदृष्टीने पाया रचला, अशी मुक्ताफळे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी उधळली. येथील काँग्रेस कमिटीच्या वतीने पं. नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात ‘पं. नेहरू यांची विचारधारा आणि राष्ट्रीय उभारणी’ या विषयावर ते बोलत होते.
आमदार चव्हाण पुढे म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गांधी यांच्या सूचनेवरून पं. नेहरू यांचे नाव पंतप्रधानपदासाठी निश्चित करण्यात आले. पं. नेहरू यांच्यावर गांधी यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत सर्वसमावेशक कारभार केला.
पं. नेहरू यांनी पंतप्रधान झाल्यानंतर केलेले पहिले भाषण आजही मार्गदर्शक आहे. सध्या भाजपने काँग्रेसच्या सर्वच नेत्यांची प्रतिमा मलीन करण्याचे काम चालू केले आहे. प्रारंभीच्या काळात देशात चालू झालेले कारखाने, उद्योग, धरणे आदी पंडितजींचे योगदान आहे. त्यांनी चालू केलेला योजना आयोग पायाभूत राष्ट्र उभारणीसाठी उपयुक्त ठरला; मात्र मोदींनी तो आयोगच रहित केला. (काँग्रेसने ६० वर्षांच्या सत्ताकाळात लाखो कोटी रुपयांचे घोटाळे करून देशावरील कर्जाचा डोंगरच वाढवला. ही राष्ट्रउभारणी आहे का ? प्रत्येक क्षेत्रात देशाला अधोगतीकडे नेणारी काँग्रेस देशाच्या प्रगतीसाठी मोठा अडथळाच आहे, असेच जनतेला वाटते ! – संपादक)