मध्यप्रदेशातील काँग्रेसच्या नेत्याच्या घरातून मोठा शस्त्रसाठा जप्त

  • काँग्रेसच्या नेत्यांचे गुन्हेगारी स्वरूप !

  • १७ पिस्तुले, २ कार्बाईन , १ सहस्र ४७८ काडतुसे जप्त

जबलपूर (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेश काँग्रेस समितीचे माजी सचिव गजेंद्र सोनकर यांच्या घरावर पोलिसांनी घातलेल्या धाडीतून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. यात बंदी असलेली ९ एम्.एम्.ची २ कार्बाईन रायफल, १७ पिस्तुले, १ सहस्र ४७८ काडतुसे, १९ मॅगझिन, तलवार, कुर्‍हाड आदींसह जंगली जनावरांची २ शिंगे सापडली आहेत. पोलिसांनी सोनकर, त्यांचा भाऊ सोनू सोनकर आणि व्यवस्थापक यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली आहे. त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याद्वारे कारवाई होण्याची शक्यता आहे. यामुळे त्यांना २ वर्षे जामीन मिळू शकत नाही. सध्या त्याच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

१. सोनकर यांनी त्याचा शस्त्र परवाना रहित झाल्यानंतर त्यांच्या आस्थापनामध्ये काम करणार्‍या एका कर्मचार्‍याच्या नावावर शस्त्र परवाना घेतला होता आणि स्वतः शस्त्र बागळत होते.

२. सोनकर यांच्या घरामधून पूर्वी ४२ भ्रमणभाष संच आणि ७ लाख ४१ सहस्र रुपये जप्त करण्यात आले होते. काही जुगार्‍यांनाही अटक करण्यात आली होती. एक जुगारी १५ लाख रुपये घेऊन पळून गेला होता. त्याचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांचा संशय आहे की, सोनकर यांचे हे घरही अनधिकृत असण्याची शक्यता आहे.