‘सुर-ताल हुनर का कमाल’ ही जागतिक ‘ऑनलाईन’ संगीत-नृत्य स्पर्धा

‘सुर-ताल हुनर का कमाल’ या जागतिक ‘ऑनलाईन’ संगीत-नृत्य स्पर्धेत महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संगीत समन्वयक कु. तेजल पात्रीकर आणि संशोधन समन्वयक कु. प्रियांका लोटलीकर यांचा ‘परीक्षक’ म्हणून सहभाग !

रामनाथी (फोंडा, गोवा) – ‘उर्वशी डान्स म्युझिक आर्ट अँड कल्चरल सोसायटी’च्या वतीने ‘सुर-ताल हुनर का कमाल’ या जागतिक स्तरावरील ‘ऑनलाईन’ संगीत-नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या मुख्य आयोजक आहेत ‘उर्वशी डान्स म्युझिक आर्ट अँड कल्चरल सोसायटी’च्या अध्यक्षा प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना डॉ. रेखा मेहरा ! कोरोनाच्या काळात कलाकारांना बाहेर कार्यक्रमांमध्ये कला सादर करण्यात मर्यादा येत असल्याने नवीन कलाकारांना स्वतःची कला सादर करण्यासाठी एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने डॉ. रेखा मेहरा यांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात भारतासहित विविध देशांतील नृत्य-गायन गुरु, नामांकित कलाकार परीक्षक म्हणून कार्यरत असणार आहेत. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संगीत समन्वयक कु. तेजल पात्रीकर आणि संशोधन समन्वयक कु. प्रियांका लोटलीकर यांचाही सहभाग असणार आहे.

कु. प्रियांका लोटलीकर
कु. तेजल पात्रीकर

‘सुर-ताल हुनर का कमाल’ या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ १५ नोव्हेंबर या दिवशी पार पडला. या वेळी डॉ. रेखा मेहरा यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. त्याचसमवेत गायन आणि नृत्य क्षेत्रातील गुरुजनांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राहुल यांनी केले. या कार्यक्रमाला भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाचाही पाठिंबा असणार आहे. या स्पर्धेमध्ये ३०० हून अधिक कलाकारांनी सहभाग घेतला आहे.

भारतीय कलांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी या स्पर्धेमध्ये केवळ भारतीय शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायन अन् नृत्य यांचाच समावेश असणार आहे. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने नृत्यातून साधना करणार्‍या दुर्ग (छत्तीसगड) येथील कु. शर्वरी कानस्कर आणि कु. अंजली कानस्कर, रत्नागिरी (महाराष्ट्र) येथील कु. अपाला ओंधकर , तसेच जोधपूर (राजस्थान) येथील कु. वेदिका मोदी यांनीही या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे. या कार्यक्रमाच्या ऑडिशनचा (कलाकाराची चाचणी) पहिला प्रयोग १८ ते २० नोव्हेंबर या कालावधीत असणार आहे. तसेच अशा प्रकारच्या ऑडिशन्स पुढेही असणार आहेत. या कार्यक्रमाच्या मुख्य आयोजन समितीमधील सदस्य देहलीमधील सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता उमेशकुमार शर्मा यांनी या कार्यक्रमामध्ये महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाला सहभागी होण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यांनी संधी दिली. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने त्यांचे आभारी आहोत.