२५० ते ३०० जिहादी आतंकवादी घुसखोरीच्या सिद्धतेत ! – सीमा सुरक्षा दलाची माहिती

  • प्रत्येक मासामध्ये सुरक्षायंत्रणांकडून किंवा गुप्तचर यंत्रणांकडून अशी माहिती दिली जाते; मात्र अशांच्या घुसखोरीची वाट पहाण्यापेक्षा त्यांच्या लाँच पॅडवर आक्रमण करून त्यांना ठार करण्याचा कोणताही आदेश कधी भारत सरकार का देत नाही ?
  • गेल्या दोन प्रसंगांत या आतंकवाद्यांनी भारतात घुसखोरी करून मोठी हानी केल्यावर ‘सर्जिकल स्ट्राईक’ आणि ‘एअर स्ट्राईक’ करण्यात आले. यातून आपण अजूनही बचावात्मक धोरण राबवत आहोत, जे चुकीचे आहे.

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – पाकमधून २५० ते ३०० जिहादी आतंकवादी भारतात घुसखोरी करण्याच्या सिद्धतेत आहेत. ते लाँच पॅडवर गोळा झाले आहेत; मात्र भारतीय सैन्य आणि सीमा सुरक्षा दल त्यांना रोखण्यासाठी पूर्णपणे सिद्ध आहे, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाचे महानिरीक्षक राजेश मिश्रा यांनी दिली.

दोन दिवसांपूर्वी काश्मीरच्या बारामुला येथील नियंत्रणरेषेवर पाकने केलेल्या गोळीबारात भारताचे ५ सैनिक हुतात्मा, तर ४ नागरिक ठार झाले होते. तसेच १९ जण घायाळ झाले होते. हुतात्म्यांपैकी राजेश डोवल या अधिकार्‍याच्या अंत्यसंस्कारासाठी मिश्रा येथे आले होते. तेव्हा ते बोलत होते. भारतानेही पाकला दिलेल्या प्रत्युत्तरात त्याचे ११ सैनिक ठार झाले होते, तर काही बंकर्स नष्ट करण्यात आले होते.

पाकच्या गोळीबारावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारतातील पाकच्या दूतावासातील वरिष्ठ अधिकार्‍याला बोलावून त्याला खडसावले. त्याच वेळी पाकनेही त्याच्या देशातील भारतीय दूतावासातील अधिकार्‍याला बोलावून भारताने केलेल्या प्रत्युत्तरादाखल गोळीबारावर आक्षेप नोंदवला. (‘चोर तो चोर, वर शिरजोर’, या वृत्तीचा पाक ! – संपादक)