भक्तीतील शक्ती !

कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील कोरोना कक्षातील रुग्णांकडून भजन आणि कीर्तन यांद्वारे सत्संग चालू असतो. या सत्संगामुळे रुग्णांचे मनोबल वाढले असून वातावरण सकारात्मक झाल्याचे आधुनिक वैद्यांनी सांगितले. प्रतिदिन कोरोनाची आकडेवारी वाढत असून त्यामुळे जनतेमध्ये भीतीचे वातावरण आहे. मागील काही दिवस ‘कोरोनावर लस येणार’, अशा आशयाच्या बातम्या येत आहेत; मात्र ‘ही लस सामान्य लोकांपर्यंत पोचायला किती वेळ लागेल’, याचा अंदाज कुणीही वर्तवू शकत नाही. अशा पार्श्वभूमीवर पुढील काही मास लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि त्याहून अधिक त्यांच्या मनस्वास्थ्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. ही सकारात्मकता किंवा ऊर्जा देवभक्तीतून मिळू शकते, हे वेगवेगळ्या उदाहरणांतून सिद्ध झाले आहे.

(चित्र सौजन्य : दिव्य मराठी)

कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी सकारात्मकता महत्त्वाची असते. छोट्या छोट्या प्रसंगांमध्ये सकारात्मक राहून आपण आयुष्य जगत असतो; मात्र एखाद्या अनाहुतपणे आलेल्या संकटाला सामोरे जाण्यासाठी मनोनिग्रह लागतो. मनोनिग्रह हा सकारात्मकतेतून येतो. ‘आपल्याला या संकटावर मात करणे जमणारच’ असे मन सकारात्मक असेल, तर निग्रहाने त्या प्रसंगाला सामोरे जाऊन मनात निर्माण झालेले भय, नकारात्मकता किंवा हतबलता यांवर मात करता येते. साधना केल्याने ही सकारात्मकता वाढू शकते. बुद्धीप्रामाण्यवाद्यांना ही गोष्ट पटत नाही; कारण ‘व्यक्ती कणखर राहिल्यास ती कोणत्याही प्रसंगाला सामोरी जाऊ शकते’, असे त्यांचे म्हणणे असते. हे योग्यही आहे; मात्र असा कणखरपणा किती जणांमध्ये असतो ? किंबहुना एखाद्या कणखर व्यक्तींवर आघातांची मालिका चालू झाल्यास ती व्यक्ती कितीही कणखर असली, तरी तिचा तोल जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मनोनिग्रह किंवा पराकोटीची सकारात्मकता हे अंगभूत गुण असणार्‍या व्यक्ती समाजात विरळाच. त्यातही संकल्प-विकल्प हे मनाचे कार्य असल्यामुळे मनाचा समतोल कधी बिघडेल आणि मन कधी नकारात्मकतेत जाईल, हे सांगता येत नाही. सध्या केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरात कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेमुळे जी अनिश्चितता निर्माण झाली आहे, त्यामुळे कुठल्याही व्यक्तीला परिस्थितीला सामोरे जाऊन स्थिर रहाता येणे कठीण आहे. अशा वेळी साधनेचे महत्त्व अधोरेखित होते. भगवंताचे नाम, त्याचे ध्यान, त्याचे स्मरण यात चैतन्य असते. हे चैतन्यच आयुष्यातील चढ-उतारांना सामोरे जाण्यासाठी बळ देते. त्यामुळे छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात अशा प्रकारे उपक्रम राबवणे, हे स्तुत्यच म्हणावे लागेल. अलीकडेच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोरोनाचे रुग्ण कशामुळे बरे झाले, याचा अभ्यास करण्याची सूचना राज्यातील डॉक्टरांना दिली होती. हे लक्षात घेऊन सर्वत्रच्या सरकारी यंत्रणांनी साधना करणार्‍या कोरोनाबाधित रुग्णांचा अभ्यास केल्यास त्यातून बरेच काही शिकता येईल आणि भक्तीतील शक्तीही सर्वांना अनुभवता येईल !