उत्तर कोरियात ‘मास्क’ न वापरणार्‍यांना ३ मास सक्त मजुरीची शिक्षा

राष्ट्राध्यक्ष किम जोंग यांचा आदेश

किम जोंग

प्योंगयांग – उत्तर कोरियात ‘मास्क’ न वापरणार्‍या नागरिकांना ३ मास सक्त मजुरीची शिक्षा देण्याचा आदेश या देशाचे हुकूमशहा तथा राष्ट्राध्यक्ष किम जोंग यांनी दिला. ‘रेडिओ फ्री एशिया’च्या वृत्तानुसार, ‘मास्क’ न वापरणार्‍या नागरिकांना कह्यात घेण्यासाठी विद्यार्थी आणि स्वयंसेवक यांचे ‘मास्क गस्ती पथक’ नेमण्यात आले आहे.

‘या कठोर शिक्षेच्या धाकामुळे तरी नागरिकांकडून ‘मास्क’चा वापर करण्यात येईल’, असा विश्‍वास उत्तर कोरियाच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. उत्तर कोरियाने अद्यापपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या जगासमोर आणली नाही. उलट उत्तर कोरियामध्ये एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नसल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे.