‘आप’चा नगरसेवक ताहिर हुसेन हाच देहलीतील दंगलीचा मुख्य सूत्रधार असल्याचा ठपका

देहली दंगलीच्या प्रकरणी पोलिसांकडून १५ जणांविरुद्ध आरोपपत्र प्रविष्ट

ताहिर हुसेन

नवी देहली – देहलीत नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात झालेल्या दंगलीच्या प्रकरणी अटक करण्यात आलेला आम आदम पक्षाचा नगरसेवक ताहिर हुसेन, त्याचा भाऊ शाह आलम आणि अन्य १३ जण, अशा एकूण १५ जणांच्या विरोधात पोलिसांनी येथील कडकडडुमा न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट केले. १ सहस्र ३० पानांच्या या आरोपपत्रात ७० साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या आहेत. ताहिर हुसेन हाच या दंगलीचा मुख्य सूत्रधार असल्याचा ठपका या आरोपपत्रात ठेवण्यात आला आहे. त्याने दंगल करण्यासाठी १ कोटी ३० लाख रुपये खर्च केल्याचे सांगितले जात आहे. दंगलीसाठी त्याने नियोजन केले होते. त्यासाठी त्याने नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी यांना विरोध करणार्‍यांची एक बैठकही आयोजित केली होती. ताहिर याला अटक केल्यानंतर आम आदमी पक्षाने त्याला पक्षातून निलंबित केले.

देहली पोलीस लवकरच येथील जाफराबादमधील दंगलीच्या प्रकरणी पुरवणी आरोपपत्र प्रविष्ट करणार आहेत. पिंजरा तोड गटातील महिलांच्या विरोधात हे आरोपपत्र असणार आहे.