रत्नागिरीत ३४ पैकी २१ कोरोना संशयित रुग्णांचे अहवाल आले ‘निगेटिव्ह’

आरोग्य यंत्रणेला दिलासा

रत्नागिरी – देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असतांना रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला मात्र दिलासा मिळाला आहे. रत्नागिरीत ३४ पैकी २१ संशयित रुग्णांची कोरोनाची चाचणी ‘निगेटिव्ह’ आली आहे. अद्याप १३ जणांवर रुग्णालयात उपचार चालू आहेत. कोरोनापासून वाचण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे.

मुंबई आणि पुणे शहरांतून रत्नागिरी जिल्ह्यात आलेल्या व्यक्तींना रहात्या घरातून बाहेर पडण्यास बंदी

मुंबई आणि पुणे या शहरांतून ०८ मार्च २०२० नंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आलेल्या व्यक्तींना आहे त्या घरातून बाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचा भंग करणार्‍या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. मुंबई आणि पुणे यांसारख्या मोठ्या शहरांत कोरोनामुळे संसर्ग झालेल्या व्यक्तींची संख्या मोठी आहे. त्यांच्यापासून अन्य नागरिकांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.