श्री स्वामी समर्थांनी स्वप्नात दर्शन देऊन गुरुचरित्र वाचण्याची आठवण करून देणे

२६ मार्च २०२० या दिवशी श्री स्वामी समर्थ प्रकटदिन आहे. त्यानिमित्ताने …

श्री स्वामी समर्थांच्या चरणी कोटीश: प्रणाम !

१. स्वप्नात श्री स्वामी समर्थांचे विराट रूपात दर्शन होऊन त्यांनी ‘तू मला विसरलास का ?’, असे म्हणताच जाग येणे

‘४.३.२०२० या दिवशीच्या रात्री स्वप्नात मला श्री स्वामी समर्थांचे दर्शन झाले. मला स्वप्नात दिसले, ‘एका झाडात कोरलेल्या श्री स्वामींच्या मूर्तीला सर्व जण नमस्कार करत आहेत. मी झाडाजवळून नमस्कार न करता पुढे चाललो आहे. तेव्हा श्री स्वामी समर्थ प्रकट होऊन मला त्यांचे विराट रूपात दर्शन झाले. त्यांनी ‘तू मला विसरलास का ?’, असे विचारताच मला जाग आली. त्या वेळी रात्रीचे २.१५ वाजले होते.’ (म्हणजे त्या दिवशी गुरुवार होता.)

२. अनेक वर्षे गुरुचरित्र पारायण केले नसल्याने त्याची आठवण श्री स्वामी समर्थांनी करून दिल्याचे जाणवणे

श्री. दत्तात्रय कुलकर्णी

मी नोकरीच्या निमित्ताने वर्ष १९७२-७३ मध्ये अक्कलकोट येथे असतांना महाराजांच्या मठात रहात होतो. त्या वेळी मी प्रतिदिन त्यांचे दर्शन घेत होतोे. तिथे मी ३ वेळा गुरुचरित्राची पारायणे केली. मी बालपणापासून विविध दत्तक्षेत्री आणि घरी गुरुचरित्राचे पारायण करत होतो; मात्र अलीकडे ४ – ५ वर्षे मी पारायण केले नाही. श्री स्वामी समर्थांनी त्याचीच आठवण जणूकाही करून दिली आणि माझ्या मनात गुरुचरित्राचे पारायण करण्याचा विचार आला.

३. परात्पर गुरुदेवांना यासंदर्भात सूक्ष्मातून विचारताच त्यांचे त्रिमूर्तीरूप डोळ्यांपुढे येणे आणि ‘या माध्यमातून गुरूंचीच महती गाणार’, अशी भावावस्था होऊन मन आनंदी होणे

मी याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सूक्ष्मातून विचारले असता माझ्या डोळ्यांसमोर त्यांचे त्रिमूर्तीरूप (सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ, परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ) आले. त्यांनीच माझ्या मनात गुरुचरित्र वाचनाचा विचार घातला. ‘या माध्यमातून मी त्यांचीच महती गाणार आहे’, अशी माझी भावावस्था होऊन मी पुष्कळ आनंदी झालो.

मी या स्वप्नदृष्टांताच्या संदर्भात पू. (सौ.) शैलजा परांजपे यांना विचारल्यावर त्यांनी या मासातच श्री स्वामी समर्थांचा प्रकटदिन असल्याचे लक्षात आणून दिले. त्यांनी ‘ही चांगली अनुभूती आहे. तुम्ही पारायण करू शकता’, असे सांगितले.

४. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये छापून आलेल्या विविध अनुभूतींद्वारे स्वप्नात झालेल्या त्रिमूर्ती दर्शनाची प्रचीती गुरुमाऊलीने देणे

७.३.२०२० या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’ मध्ये श्री. विनायक शानभाग यांची अनुभूती प्रसिद्ध झाली आहे. त्यांना एका प्रसंगी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ साक्षात् दत्तगुरु असल्याचे जाणवले. ८.३.२०२० या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’ मध्ये ‘प.पू. श्री श्री श्री बालमंजुनाथ महास्वामीजी यांनी ‘परात्पर गुरु डॉक्टर दत्तगुरूंचे रूप आहेत’, असे जाणून त्यांनी ३ फळे परात्पर गुरुदेवांना दिली’, असे प्रसिद्ध झाले आहे. यावरून ‘स्वप्नात झालेल्या त्रिमूर्ती दर्शनाची प्रचीती गुरुमाऊलीने दिली’, असे वाटते.

५. कृतज्ञता

त्यानंतर दत्तगुरूंचे चित्र आणि परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र समोर ठेवून पंचोपचार पूजा करून ७.३.२०२० या दिवसापासून पारायण करण्याचे नियोजन परात्पर गुरु डॉक्टरांनीच माझ्याकडून करवून घेतले. त्याविषयी मी गुरुमाऊलीच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– श्री गुरुचरणदास,

श्री. दत्तात्रय कुलकर्णी, गावभाग, सांगली. (९.३.२०२०)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  सूक्ष्म. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.