‘४.२.२०२५ या दिवशी डॉ. श्रीपाद पेठकर यांनी देवाला सूक्ष्मातून प्रश्न विचारला. तेव्हा देवाने त्यांना सूक्ष्मातून दिलेले उत्तर येथे दिले आहे.

‘प्रश्न : ‘एखाद्या उन्नत व्यक्तीला श्रद्धास्थानी मानून साधनेचे प्रयत्न करत असतांना साधकाला त्या व्यक्तीचे आचार-विचार साधनेशी विसंगत वाटतात. अशा वेळी साधकाला आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो का ?
देवाने दिलेले उत्तर : या प्रश्नाचे उत्तर व्यक्तीसापेक्ष आहे.
१. उन्नत व्यक्तीचे वागणे सामान्य व्यक्तीच्या बुद्धीपलीकडील असल्याने उन्नतांचे आचार-विचार आणि विहार यांकडे दुर्लक्ष केल्यास उन्नत व्यक्तीच्या आध्यात्मिक भावाचा लाभ होणे : ‘साधनेच्या अत्युच्च टप्प्यावर असणार्या व्यक्ती निर्गुणाकडे जात असल्यामुळे त्यांचे वागणे, बोलणे हे सामान्य माणसाच्या विचारांच्या पलीकडचे असते. अशा उन्नत व्यक्तीच्या सहवासाचा लाभ आध्यात्मिक स्तरावर घेण्यापेक्षा लोक त्यांना व्यावहारिक प्रश्न विचारतात. तेव्हा काही वेळा त्या उन्नतांचे आचार-विचार, विहार इतरांना वेगळे वाटतात. काही उन्नतांचे बोलणे रागानेही होते.
साधकाला अध्यात्मात प्रगती करायची असल्याने तो उन्नतांच्या या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. तेव्हा त्याला उन्नत व्यक्तीच्या आध्यात्मिक भावाचा लाभ होतो. त्यामुळे साधक या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून उन्नत व्यक्तीच्या ठिकाणी एकनिष्ठ रहाण्यासाठी प्रयत्न करत असतो.
२. व्यक्तीच्या आध्यात्मिक भावामुळे श्रद्धेय व्यक्तीच्या ठिकाणी देवत्व येणे आणि असा भाव ठेवणार्या व्यक्तीला आध्यात्मिक स्तरावर लाभ होणे : एखादी व्यक्ती आध्यात्मिकदृष्ट्या प्रगत नसेल; परंतु त्या व्यक्तीच्या सद्वर्तनामुळे तिच्या ठिकाणी भाव ठेवून त्या व्यक्तीला कुणी श्रद्धास्थानी मानत असेल, तर अशा वेळी श्रद्धेय व्यक्तीचे आचार-विचार विसंगत असले, तरी समोरील व्यक्तीच्या आध्यात्मिक भावानुसार श्रद्धेय व्यक्तीच्या ठिकाणी देवत्व येते आणि त्याचा लाभ भाव ठेवणार्या व्यक्तीला निश्चितच होतो.
३. देवाने व्यक्तीच्या आध्यात्मिक भावानुसार तिला भावभक्तीचे फळ देणे : श्रद्धास्थानी असलेल्या व्यक्तीला या देवत्वाची जाणीव असेलच, असे नाही. केवळ भक्ती करणार्या व्यक्तीसाठी देव अशा व्यक्तीच्या माध्यमातून त्याच्या भावभक्तीचे फळ निश्चितच देतो. त्याची साधना व्यर्थ जात नाही. जसे पंढरपूर किंवा त्याच्या जवळपास रहाणारी व्यक्ती इतर ठिकाणी जाते. तेव्हा तेथील माणसे ‘ती व्यक्ती पंढरपूरची, म्हणजे पांडुरंगाच्या जवळची आहे’, अशा भावाने त्या व्यक्तीला नमस्कार करतात. अशा वेळी ती व्यक्ती कशीही असली, तरी नमस्कार करणार्या व्यक्तीच्या भावानुसार त्या ठिकाणी श्री विठ्ठलाचे तत्त्व येऊन तिला विठ्ठलाच्या दर्शनाचा लाभ होतो; परंतु पाया पडून घेणार्या व्यक्तीला याची जाणीव असेलच, असे नाही.
यावरून भगवंत किती कृपाळू आहे, हे माझ्या लक्षात आले.’
– डॉ. श्रीपाद व्यंकटेश पेठकर, पंढरपूर, सोलापूर. (४.२.२०२५)
|