परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वप्नात दर्शन देऊन साधकाला आश्वस्त करणे आणि त्याची साधना चांगली होणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. ‘राष्ट्र आणि धर्म यांची बाजू घेऊन अधिवक्ता म्हणून व्यवसाय केल्यास त्यातून साधना होईल’, असा विचार मनात येणे

‘प.पू. गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) अपार कृपेने बिहार, सोनपूर येथील साधक श्री. राकेश श्रीवास्तव यांच्या माध्यमातून मी मागील दीड वर्षांपासून साधनेत आहे. वर्ष २००८ पासून मी पाटणा उच्च न्यायालयात अधिवक्ता म्हणून कार्यरत आहे. जानेवारी २०२४ पासून माझ्या मनात विचार आला, ‘मी राष्ट्र आणि धर्म यांची बाजू घेऊन अधिवक्ता म्हणून व्यवसाय केल्यास त्यातून माझी साधनाही होईल.’

अधिवक्ता प्रभाष ठाकूर

२. सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी नामजप आणि व्यष्टी साधना यांकडे प्रथम लक्ष देण्यास सांगणे

मी सद्गुरु नीलेश सिंगबाळ आणि श्री. विश्वनाथ कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ४४ वर्षे) यांच्याशी बोललो. तेव्हा त्यांनी मला सांगितले, ‘‘तुम्ही नामजप आणि व्यष्टी साधना यांकडे प्रथम लक्ष दिले पाहिजे, तर ईश्वर तुमच्याकडून सर्व चांगल्या कृती करून घेईल. तुम्ही अधिक विचार करू नका.’’

३. अधिवक्ता म्हणून करत असलेला व्यवसाय बंद केल्यावर मन अशांत होऊन मायेतील विचार वाढणे

११.६.२०२४ या दिवशी साधारणतः ६ मासांनंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की, मी माझ्याकडे असलेले सर्व खटले अशीलांना बोलावून त्यांना परत केले. मी माझा अधिवक्ता म्हणून व्यवसाय ९० ते ९५ टक्के बंद केला. त्यानंतर माझे मन अशांत राहू लागले. मी माझ्या आई-वडिलांकडे गेलो, तरीही मला शांतता लाभली नाही. माझ्या मनात ‘माझ्या कुटुंबाचा चरितार्थ कसा चालेल ? माझ्या तीन कन्यांचे कसे होणार ? आता मला जीवन जगणे कठीण होणार का?’, असे मायेतील विचार प्रबळतेने वाढू लागले.

४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वप्नात येऊन ‘चिंता करू नका’, असे सांगणे आणि त्यानंतर मायेविषयी चिंता न्यून होऊन आनंदी जीवन जगता येणे

एकदा रात्री माझ्या मनात मायेतील विचारांचे प्रमाण पुष्कळ प्रमाणात वाढल्यामुळे मला झोपच लागत नव्हती. त्या रात्री १ वाजता प.पू. गुरुदेव माझ्या स्वप्नात आले आणि म्हणाले, ‘तू अनावश्यक चिंता करू नको. मी आहे ना !’ त्यांचे बोलणे ऐकून मला पुष्कळ रडू आले. त्यानंतर मला चांगली झोप लागली. तेव्हापासून मी आनंदी जीवन जगत आहे. आता माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य आनंदी आहेत आणि सर्व जण साधना करण्याचा प्रयत्न करत आहेत. माझी मायेविषयीची चिंता न्यून होत आहे; कारण ‘माझे गुरुदेव आहेत ना !’

– अधिवक्ता प्रभाष रंजन ठाकूर, पटना, बिहार.(२४.१०.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक