S Jaishankar On POK : पाकव्याप्त काश्मीर भारतात आल्यावर काश्मीरची समस्या कायमची सुटेल !

भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांचे लंडन येथे विधान

भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

लंडन (ब्रिटन) – पाकिस्तानने बळकावलेला काश्मीरचा भाग परत भारतात कधी येणार, याची आम्ही प्रतीक्षा करत आहोत. पाकव्याप्त काश्मीर भारतात परत आल्यावर काश्मीरचे सर्व प्रश्न सुटतील, याची मी तुम्हाला निश्चिती देतो, असे विधान भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी येथे ‘चॅथम हाउस’मध्ये ‘भारताचा उदय आणि वैश्विक भूमिका’ या विषयावरील मुलाखतीच्या वेळी बोलतांना केले.

डॉ. एस्. जयशंकर यांना एका व्यक्तीने ‘काश्मीर प्रश्न भारत कसा सोडवणार आहे ? तिथे शांतता कशी प्रस्थापित करणार ?’ असा प्रश्न विचारला. यावर डॉ. जयशंकर म्हणाले की, काश्मीरमध्ये शांतता निर्माण करण्याची प्रक्रिया ३ टप्प्यांमध्ये पार पडत आहे. पहिल्या टप्प्यात आम्हाला कलम ३७० हटवावे लागणार होते. आम्ही पहिला टप्पा पूर्ण केला आहे. काश्मीरमध्ये शांतता निर्माण करण्यासाठीच आम्ही ते केले. दुसर्‍या टप्प्यात काश्मीरमध्ये विकास आणि आर्थिक उलाढाल वाढवण्यासह सामाजिक न्याय बहाल करण्याची प्रक्रिया चालू आहे. तिसर्‍या टप्प्यात काश्मीरमध्ये मतदानाचे प्रमाण वाढवून लोकशाही अधिक बळकट करण्याचे काम केले जात आहे. आम्ही नुकतीच जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक घेतली.

अमेरिकेच्या धोरणांचा भारताला लाभ होईल !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्या धोरणांविषयी प्रश्न विचारल्यावर डॉ. एस्. जयशंकर म्हणाले की, ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकी सरकार नव्या व्यवस्थेच्या दिशेने चालले आहे. अमेरिकेचे हे धोरण भारताच्या हिताचेच आहे. दोन्ही देश द्विपक्षीय व्यापारी कराराच्या आवश्यकतेवर सहमत आहेत.

भारतासाठी चीनसमवेत सीमा हा एक महत्त्वाचा पैलू आहे !

‘भारताला चीनसमवेत कशा प्रकारचे संबंध हवे आहेत ?’ या प्रश्नावर डॉ. जयशंकर म्हणाले की, आमचे एक अतिशय वेगळे नाते आहे. जगात एक अब्जाहून अधिक लोकसंख्या असलेले आम्ही दोनच देश आहोत. आम्हा दोघांचाही इतिहास पुष्कळ जुना आहे, ज्यामध्ये कालांतराने चढ-उतार आले आहेत. आज दोन्ही देश पुढे जात आहेत आणि आम्ही शेजारीही आहोत. जसजसा एखादा देश वाढत जातो, तसतसे त्याचे जगाशी आणि त्याच्या शेजार्‍यांशी असलेले संतुलन पालटते. मुख्य सूत्र म्हणजे समतोल कसा निर्माण करायचा, हा आहे. आमच्या हितांचा आदर केला जाईल, असे स्थिर संबंध आम्हाला हवे आहेत. हे खरेतर आमच्या नात्यातील मुख्य आव्हान आहे. सीमा हा भारतासाठी एक महत्त्वाचा पैलू आहे. गेल्या ४० वर्षांपासून असा विश्वास आहे की, संबंध वाढवण्यासाठी सीमावर्ती भागात शांतता आणि स्थिरता आवश्यक आहे. जर सीमा अस्थिर असेल किंवा शांततेचा अभाव असेल, तर त्याचा आपल्या संबंधांवर निश्चितच परिणाम होईल.

खलिस्तान्यांनी डॉ. जयशंकर यांच्या वाहनासमोर भारताचा राष्ट्रध्वज फाडला !

डॉ. जयशंकर यांच्या वाहनासमोर भारताचा राष्ट्रध्वज फाडताना खलिस्तानी

(वरील छायाचित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही राष्ट्रीय भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक)

परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर ‘चॅथम हाऊस’मधून बाहेर पडल्यानंतर काही खलिस्तानी समर्थकांनी त्यांच्या वाहनासमोर घातलेल्या गदारोळाचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. डॉ. जयशंकर बाहेर पडत असतांना समोर रस्त्याच्या पलीकडेच काही खलिस्तानी समर्थक घोषणाबाजी देत होते. डॉ. जयशंकर गाडीत बसताच समोरच्या आंदोलकांमधून एक खलिस्तानी समर्थक त्यांच्या गाडीसमोर आला आणि तिथेच त्याने भारताचा राष्ट्रध्वज फाडला. यानंतर तिथे उभ्या असलेल्या लंडन पोलिसांनी त्याला बाजूला नेले आणि परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांचा ताफा पुढे मार्गस्थ झाला.

या घटनेवरून भारतियांकडून लंडन पोलिसांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त होताना दिसत आहे. ‘लंडन पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका का घेतली ?’, ‘त्यांचेही आंदोलकांना समर्थन होते का ?’, असे प्रश्न विचारले जात आहेत. (लंडन पोलीस खलिस्तानधार्जिणे आहेत, हे यापूर्वीही दिसून आले आहे. भारतीय वंशाचे ऋषी सुनक पंतप्रधान असतांना त्यांनीही खलिस्तानींवर कारवाई केली नव्हती, हे लक्षात घ्यायला हवे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

अशा भारतद्रोही खलिस्तान्यांचा भारतातील शीख उघडपणे विरोध का करत नाहीत ?