Scotland Passes Motion To Combat Hinduphobia : स्कॉटलंडच्या संसदेत हिंदुद्वेषाच्या विरोधातील प्रस्ताव सादर !

एडिंबबर्ग (स्कॉटलंड) – युरोपमधील स्कॉटलंड देशाच्या संसदेत हिंदुद्वेषाच्या विरोधात प्रस्ताव मांडण्यात आला आहे. हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांचा येथे पहिल्यांदाच अधिकृत निषेध करण्यात आला आहे. अल्बा पक्षाच्या खासदार ॲश रेगन यांनी हा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाचा उद्देश स्कॉटलंडमध्ये रहाणार्‍या हिंदु समुदायाला समाजात होणार्‍या भेदभाव, द्वेष आणि दुर्लक्षाविरुद्ध आवाज उठवणे आहे. या प्रस्तावात स्पष्टपणे म्हटले आहे की, स्कॉटलंडमधील हिंदु समुदायाला भेदभाव, बहिष्कार आणि द्वेष यांचा सामना करावा लागत आहे.

१. संसदेत मांडलेल्या या प्रस्तावाला कॉलिन बीटी, स्टेफनी कॅलाघन आणि केविन स्टीवर्ट यांच्यासह अनेक खासदारांचा पाठिंबा मिळाला आहे.

२. प्रस्ताव सादर करतांना ॲश रेगन म्हणाल्या की, हा प्रस्ताव केवळ प्रतीकात्मक नाही, तर ठोस पालट करण्याचे आवाहन आहे.

३. गांधीयन पीस सोसायटीच्या ‘स्कॉटलंडमधील हिंदूफोबिया (हिंदूंविषयी तिरस्कार) : पूर्वग्रह समजून घेणे, संबोधित करणे आणि त्यावर मात करणे’ या अहवालाच्या आधारे हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. हा अहवाल या सोसायटीचे सरचिटणीस ध्रुव कुमार, अध्यक्ष अनुरंजन झा, सुखी बैंस, अजित त्रिवेदी आणि ‘इंडियन कौन्सिल ऑफ स्कॉटलंड अँड यूके’चे अध्यक्ष नील झाला यांनी लिहिला आहे.

स्कॉटलंडमध्ये ३० सहस्र हिंदू !

या अहवालात मंदिरांवरील आक्रमणे, कामाच्या ठिकाणी हिंदु कर्मचार्‍यांशी भेदभाव, हिंदु सण आणि परंपर यांची थट्टा, शाळा अन् सार्वजनिक जीवन येथे सांस्कृतिक दुर्लक्ष, तसेच कधीकधी शारीरिक किंवा मानसिक आक्रमणे यासह अनेक धक्कादायक तथ्ये उघड झाली आहेत. या सर्व घटना स्कॉटलंडमध्ये रहाणार्‍या ३० सहस्र हिंदूंनी सांगितल्या आहेत.

संपादकीय भूमिका

विदेशांमध्ये हिंदुद्वेषाच्या विरोधात संसदेत प्रस्ताव सादर होत आहेत; मात्र भारतात हिंदुद्वेषच नाही, तर हिंदूंवर आक्रमणे होत असतांना काही मोजके वगळता हिंदु लोकप्रतिनिधी, राजकीय नेते हिंदूंच्या समर्थनार्थ  पुढे येत नाहीत, हे त्यांना निवडून देणार्‍या हिंदूंना लज्जास्पद आहे !