देवघर आणि देव्हारा

१. देवघर आणि नित्य देवपूजा यांचे महत्त्व

‘प्रत्येक कुटुंबाच्या घरात देव्हारा असणे अत्यावश्यक आहे. ज्या घरात देव्हारा नाही, ते घर आध्यात्मिकदृष्ट्या स्मशानवत् मानले जाते. हयात असलेल्या आई-वडिलांपासून मुलगा स्वतंत्र रहात असला, तर त्याच्या कुटुंबात स्वतंत्र देव्हारा असणे आवश्यक आहे. नित्य देवपूजेविना कुटुंबजीवन हे एक प्रकारे आसुरी जीवनच ठरते. ईश्वरी साक्षीने चाललेला संसार हा चतुर्भुज विष्णूचाच संसार असल्यामुळे त्यात शांती आणि समाधान असते. ज्या संसारात ईश्वराची नित्य पूजा आणि उपासना यांचे अधिष्ठान नसते, ते एक प्रकारे चतुष्पादाचे, म्हणजे पशूतुल्यच संसारी जीवन ठरते. कुटुंबाचे सर्व दैनंदिन व्यवहार ईश्वर साक्षीनेच होणे आवश्यक आहे.

२. घरातील देवघराची दिशा आणि त्यामुळे होणारा लाभ अन् हानी

ईश्वराचे मूळ अधिष्ठान ईशान्य दिशेस असल्यामुळे देव्हार्‍याची योग्य जागा ही ईशान्य कोपर्‍यात असते. वास्तूच्या ईशान्य कोपर्‍यात देव्हार्‍याचे तोंड पश्चिमेस असले, तरी चालेल. ईशान्य कोपर्‍यात शक्य नसेल, तर वास्तूच्या उत्तर भिंतीच्या बाजूस मध्यावर पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून देव्हारा चालेल. वास्तूच्या पूर्वेकडील भिंतीच्या मध्यावरही पश्चिमेकडे तोंड करून देव्हारा चालेल. देव्हारा वास्तूच्या किंवा त्या खोलीच्या दक्षिण भिंतीजवळ किंवा नैऋत्य कोपर्‍यात असू नये; कारण ते अतीपीडादायक ठरते.

३. वास्तूमध्ये देव्हारा बनवतांना काय करावे आणि काय करू नये ?

३ अ. काय करावे ?

१. उंबरठा : देवघराला उंबरठा अवश्य असावा.

२. दारे : देवघराची दारे उत्तर-पूर्वेस (ईशान्य दिशेस) असावी.

३. कपाटे : देवघरातील कपाटे दक्षिण आणि पश्चिम या दिशांना असावीत.

४. हवन : देव्हार्‍याच्या आग्नेय कोपर्‍यात पूर्वेकडे तोंड करून हवन करावे.

३ आ. काय करू नये ?

१. देवघराच्या वर किंवा खाली शौचालय नसावे.

२. देव्हार्‍याच्या वरती माळा असू नये. माळा असल्यास तो वापरू नये.

३. देवघर भिंत कोरून बनवू नये. देव्हारा पूर्ण भिंतीस चिकटवून ठेवू नये.

४. देव्हार्‍याच्या अगदी समोर तिजोरी नसावी.

३ इ. वास्तूमध्ये देव्हारा बनवतांना येणारी अडचण आणि त्यावरील उपाय : ‘देव्हारा शयनगृहात नसावा’, हे अगदी योग्य असले, तरी बहुतांश लोकांच्या दीड खोलीच्या निवासात या नियमाचे पालन अतीकठीण ठरेल. तेव्हा निदान देव्हार्‍यासमोर तात्पुरत्या लाकडी ‘पार्टिशन’ची (लाकडाच्या फळीने केलेल्या विभागणीची) ६ फूट उंचीची व्यवस्था कायमस्वरूपी किंवा सरकती असावी.

४. देव्हार्‍यातील देवांच्या मूर्ती आणि त्यांची मांडणी

अ. देव्हार्‍यात न्यूनतम देव, मूर्ती किंवा प्रतिमा असाव्यात. कुलदेवतेचे टाक (टीप), मूर्ती किंवा प्रतिमा, इष्टदैवत, लंगडा बालकृष्ण, काळ्या दगडाची किंवा पंचधातूची नंदी आणि नाग नसलेली शंकराची पिंडी, पितळ्याचा किंवा चांदीचा डाव्या सोंडेचा गणपति ठेवू शकतो, तसेच देवतांची २ – ३ यंत्रे असली, तर चालतील; पण यंत्रे ही देवतांची आसने असतात; म्हणून ती उभी मांडू नयेत. ती भूमीशी समांतर असावीत.

टीप – टाक म्हणजे देवतांच्या प्रतिमेचा ठसा उमटवलेला धातूच्या पत्र्याचा तुकडा.

आ. एकाच देवाच्या २ किंवा त्यापेक्षा अधिक मूर्ती पूजेत असू नयेत. एकाच देवाच्या २ किंवा अधिक मूर्ती असल्यास त्यांपैकी एकही मूर्ती कार्य करत नाही. त्याच देवतेची एक मूर्ती आणि एक प्रतिमा चालेल. २ निरनिराळ्या देवी असल्या, तरी चालतील. दोनपेक्षा अधिक नकोत.

इ. देव्हार्‍यातील पूजेच्या मूर्ती ३ इंचांपेक्षा अल्प उंचीच्या असाव्यात. त्यापेक्षा अधिक उंचीच्या मूर्ती विसर्जित कराव्यात.

ई. देवांच्या मूर्ती पूर्वाभिमुख किंवा पश्चिमाभिमुख असाव्यात.

उ. देव्हार्‍यातील देवांना गंज किंवा माती लागलेली असू नये. देव भग्न, भोक पडलेले, आसन आणि आयुधे हलत असलेले, चीर गेलेले, विद्रूप झालेले अन् पाण्यात टाकल्यावर बुडबुडे येणारे नसावेत. अशा मूर्तींचे त्वरित विसर्जन करून नवीन मूर्ती स्थापन कराव्यात.

ऊ. देवपूजेतील देव ‘एकमेकांस पहात आहेत’, अशा प्रकारे मांडू नयेत.

ए. देवाची चित्रे दक्षिणेकडील भिंतीला लावू नयेत. देवघरात प्राणी, पशू, पक्षी, महाभारताचे युद्धप्रसंग इत्यादी चित्रे लावू नयेत. देवघराच्या प्रवेशद्वारासमोर देवतांच्या प्रतिमा लावू नयेत.

ऐ. देवघरात अडगळीच्या वस्तू ठेवू नयेत.

ओ. प्राचीन मूर्तींचे भग्न अवशेष देवघरात ठेवू नयेत.

औ. देव्हार्‍यात धन किंवा पैसे दडपून ठेवू नयेत.

५. देव्हार्‍यात कोणत्या देवांची पूजा करू नये ?

अ. दत्तक गेलेल्या (जे दुसरीकडे दत्तक गेले असल्याने त्यांच्या पूर्वीच्या घरातील देवघर शिल्लक असेल, अशा) किंवा बुडित घराण्याचे देव देव्हार्‍यात पुजू नयेत. ते सर्वच विधीवत् विसर्जित करून नवीन देव आणावेत. सोन्याचे देव असले, तरीही ते विसर्जितच करावेत, नाहीतर पूजकाचीही वंशबुडी होईल, तसेच तो अनेक संकटांनी त्रस्त होईल.

आ. देव्हार्‍यात शनीची पूजा करू नये. त्याची पूजा केल्यास सर्व जीवन संकटमय आणि अतीउदास रहाते.

इ. देव्हार्‍यात मुंजाच्या टाकाची (टीप) पूजा करू नये. त्याची पूजा केल्यास बाकीचे देव कार्य करत नाहीत, तसेच त्या मुंजास सद्गतीपासून बंधनात अडकवल्यामुळे पूजा करूनही त्याचे केवळ शापच मिळतात.

टीप – मुंजा म्हणजे भुताचा एक प्रकार. ‘एखाद्या मुलाचा उपनयनानंतर आणि सोडमुंज होण्यापूर्वी मृत्यू झाल्यास (त्याची लग्न करण्याची इच्छा अपूर्ण राहिल्यामुळे) तो ‘मुंजा’ होतो आणि पिंपळावर रहातो’, असे शास्त्र सांगते. त्याचा प्रतीकात्मक टाक आहे.

ई. देव्हार्‍यात गायत्रीमातेची पूजा करू नये; कारण गायत्रीमातेचे स्वरूप पराकोटीचे पवित्र आहे. त्यासाठीची पाळणूक (सोवळे-ओवळे) अतिशय कडक असते. विटाळशा (मासिक पाळी चालू असलेल्या) स्त्रीची छायासुद्धा त्यावर पडलेली चालत नाही. गायत्रीमातेचे चित्र देवघरात उंचावर लावले, तर चालेल.

उ. देव्हार्‍यात कालभैरवाची पूजाही निषिद्ध आहे. तो यम असून स्वभावाने अतीउग्र आणि कडक आहे. त्याचे चित्र देवघरात उंचावर लावले, तर चालेल.

ऊ. देव्हार्‍यात म्हसोबा पुजू नये. त्याची पूजा केल्याने कुटुंबावर कुलदेवीचे कृपाछत्र रहात नाही. कुटुंब अनेक संकटांनी नित्य पीडित रहाते.

ए. गुरु आणि शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये. तसे केल्यास शिष्याचा कोप होतो.

ऐ. पारितोषिक म्हणून मिळालेले किंवा सापडलेले देव देव्हार्‍यात पुजू नयेत.

ओ. आसरा (जलदेवता) देव्हार्‍यात पुजू नयेत. त्या देवता शुक्रवारी विधीवत् पाण्यात सोडाव्यात.

६. देवांच्या मूर्ती शोभेसाठी शोकेसमध्ये (शोभेच्या वस्तू ठेवण्याच्या कपाटात) ठेवू नयेत; कारण त्या देवांची कुटुंबावर अवकृपा होऊ शकते.

७. नैवेद्य दाखवणे

देव्हार्‍यात सकाळ-संध्याकाळ नित्याच्या जेवणाचा नैवेद्य असावा. नैवेद्य दाखवल्याविना घरी कुणी जेवण करू नये. सकाळी लवकर कुणाला डबा द्यायचा असेल किंवा लहान मुलांना खाऊ घालायचे असेल, तर आधी देवाचा नैवेद्य बाजूला काढून ठेवावा आणि नंतर घरातल्यांना जेवायला वाढावे. पूजा झाल्यावर बाजूला काढून ठेवलेल्या अन्नाचा नैवेद्य दाखवावा. जे कुटुंब देवांना न चुकता नित्य जेवणाचा नैवेद्य दाखवतात, त्यांना देव जीवनात कधीही दोन्ही वेळच्या अन्नाची उणीव भासू देत नाही. देवाच्या मूर्ती उत्तरेकडे तोंड करून असल्या, तर नैवेद्य समोरून न दाखवता बाजूस पूर्व किंवा पश्चिम या दिशांना तोंड करून दाखवावा.’

– श्री स्वामी समर्थ दरबार, दिंडोरी

(साभार : त्रैमासिक ‘श्री स्वामी समर्थ’, वर्ष १९९६)

संपादकीय भूमिका

ज्या संसारात ईश्वराची नित्य पूजा आणि उपासना यांचे अधिष्ठान नसते, ते एक प्रकारे चतुष्पादाचे, म्हणजे पशूतुल्यच संसारी जीवन ठरते !