स्वारगेट (पुणे) बलात्कार प्रकरण
आरोपी दत्तात्रय गाडे याला १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी !

पुणे – स्वारगेट बसस्थानकातील बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी दत्तात्रय गाडे याला २८ फेब्रुवारीच्या पहाटे पोलिसांनी अटक केली. त्याला पुणे न्यायालयाने १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गेल्या ३ दिवसांपासून पुणे पोलिसांचे विशेष पथक गुणाट गावात आरोपीचा शोध घेत होते. ५०० हून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी, श्वान पथक आणि ‘ड्रोन’च्या साहाय्याने शोधमोहीम राबवण्यात आली. ग्रामस्थांनी आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांना सहकार्य केले, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
आरोपी ज्या परिसरात लपला होता, तेथे पोलिसांनी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून त्याला पकडले. संपूर्ण घटनेचे सत्य समोर येईल. सध्या याविषयी अधिक बोलणे योग्य होणार नाही. – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चौकशीतून सत्य समजेल. आरोपीला कडक शिक्षा दिली जाईल. – उपमुख्यमंत्री अजित पवार |
अटकेनंतर वैद्यकीय पडताळणीत आरोपीच्या मानेवर दोरखंडासारखे व्रण आढळले. त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता का ? हे पहावे लागेल, असेही पोलीस आयुक्त म्हणाले. आरोपीने पोलिसांसमोर गुन्हा मान्य केला.
युवक राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून आंदोलन !आरोपी गाडे याला लष्कर पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. पोलीस ठाण्याबाहेर युवक राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने ‘आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी’, ‘गृहमंत्री आणि पालकमंत्री यांनी त्यागपत्र द्यावे’, अशा घोेषणा देत आंदोलन केले. |
पोलीस आयुक्त म्हणाले की,…
१. पोलीस आणि गुन्हे शाखा यांच्यात आरोपीला पकडण्यावरून श्रेयवादाची चर्चा चालू आहे; पण यात श्रेयवाद नाही. हे सांघिक प्रयत्न आहेत.
२. बसस्थानकातील २३ सीसीटीव्ही आणि स्थानकाबाहेरील ४८ सीसीटीव्ही पडताळल्यानंतर आरोपीची ओळख झाली. आरोपी गुणाट गावातील उसाच्या शेतात लपला होता. त्याला पकडण्यासाठी स्थानिकांनी सहकार्य केल्याविषयी मी त्यांना धन्यवाद देतो. गावात भेट देऊन नागरिकांचा सत्कार करू.
३. शेवटच्या माहितीनुसार आम्ही त्याला पकडले. ज्याने शेवटची माहिती दिली, त्याला १ लाख रुपयांचे पारितोषिक देऊ.
संपादकीय भूमिका :आरोपीला अटक करून समाधान मानण्यात येऊ नये, तर त्याला जलद गती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत, असेच जनतेला वाटते ! |
स्वारगेट (पुणे) बसस्थानकातील अत्याचार प्रकरणातील गुन्हेगाराला कठोर शिक्षा करावी !

हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या वतीने पुणे पोलीस आयुक्तांना निवेदन !
पुणे, २८ फेब्रुवारी (वार्ता.) – विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणार्या पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात िशवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर दत्तात्रय गाडे या सराईत गुन्हेगाराने बलात्कार केला आहे. छत्रपतींच्या महाराष्ट्रात मुली आणि महिला यांच्यावर अत्याचार होणे, हे लज्जास्पद आहे. त्यासाठी या घटनेचे सखोल अन्वेषण होऊन यात सामील असलेल्या दोषी व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना कायद्याने कडक शिक्षा व्हावी, अशा मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या वतीने पुणे पोलीस आयुक्तांना देण्यात आले. हे निवेदन पोलीस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी स्विकारले. आयुक्तांनी निवेदन स्वीकारल्यावर सकारात्मक प्रतिसाद देत कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
निवेदन देतांना अधिवक्ता मृणाल व्यवहारे, कु. क्रांती पेटकर, अधिवक्त्या मनीषा जाधव, अधिवक्त्या निधी शर्मा, सौ. प्रणाली सोनवणे आदी उपस्थित होते.
निवेदनात पुढे म्हटले आहे की,
१. दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात चोरीचे, हाणामारीचे २ गुन्हे नोंद आहेत. त्याला पहिल्याच गुन्ह्यात कठोर शिक्षा केली असती, तर गुन्हेगाराचे पुढील गुन्हे करण्याचे धाडसच झाले नसते. आता त्याला अटक करण्यात आली आहे. आतातरी त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी जेणेकरून तो पुन्हा असे गुन्हे करण्यास धजावणार नाही.
२. स्वारगेट बसस्थानकामध्ये जुन्या बंद पडलेल्या बसमध्ये गर्भनिरोधक, साड्या, शर्ट, चादरी सापडल्या आहेत. यातून या बसमध्ये काय प्रकार चालू असतील, याची कल्पना येऊ शकते. यासाठी सुरक्षा कर्मचारी उत्तरदायी असून येथे काय चालू आहे ? हे त्यांना ठाऊक नाही, हे अत्यंत गंभीर आहे. त्यासाठी या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करावी.