खनिजाची अवैध वाहतूक रोखण्यासाठी यंत्रणा अद्ययावत करण्याच्या खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

मंत्रालयात कोकण महसूल विभागाची आढावा बैठक

मुंबई – राज्यात अवैधरित्या होणारी खनिज वाहतूक रोखण्यासाठी खनीकर्म विभागाने यंत्रणा अद्ययावत करून त्यावर तात्काळ निर्बंध आणावेत, असे निर्देश पर्यटन, खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

मंत्रालयात २४ फेब्रुवारीला कोकण महसूल विभागाची आढावा बैठक झाली. या वेळी विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बालसिंह चहल, महासंचालक डॉ. जी.डी. कांबळे, उपसंचालक रोशन मेश्राम आणि कोकण विभागातील सर्व जिल्हा खनिकर्म अधिकारी उपस्थित होते.
खनिजाची वाहतूक करतांना खनिजे झाकलेली नसल्याने धूळ उडून प्रदूषण होते, तसेच अपघात होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा प्रकारे वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाई करून खाणीचे परवाने तत्काळ निलंबित करावेत. खाणींमधून खनिज आणि गौण खनिज यांची होणारी चोरी रोखण्यासाठी सी.सी.टी.व्ही. लावून त्याचे नियंत्रण जिल्हा खनीकर्म अधिकार्‍यांच्या भ्रमणभाषवर ठेवावे, जेणेकरून चोर्‍या रोखता येतील. राज्यातील खनिकर्म विभागाची यंत्रणा सर्वंकष दृष्टीकोनातून अद्ययावत कराव्यात.

कोकण महसूल विभागात लिलावाद्वारे ज्या संस्थांनी खाणी उत्खननासाठी घेतल्या आहेत,  त्यांना एक महिन्याची नोटीस देऊन तात्काळ काम चालू करण्याचे आदेश द्यावेत. अन्यथा संबंधित संस्थेचा उत्खननाचा परवाना निलंबित करण्यात यावा, अशा सूचना मंत्री देसाई यांनी या वेळी दिल्या.