उमाटे कॉलेज, खामला येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीकारक यांचे योगदान’ यावर प्रवचन

हिंदु जनजागृती समितीचा उपक्रम !

प्रवचनाला उपस्थित विद्यार्थी

नागपूर, २४ फेब्रुवारी (वार्ता.) – उमाटे कॉलेज येथे इयत्ता पहिली ते नववीच्‍या विद्यार्थ्‍यांसाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीकारकांचे योगदान’ या विषयावर प्रवचन आयोजित करण्‍यात आले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. अभिजीत पोलके यांनी या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्‍हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज सर्वार्थाने अलौकिक व्‍यक्‍तिमत्त्व आहे. ४०० वर्षांनंतरही ते प्रत्‍येकासाठी प्रेरणादायी आहेत. आयुष्‍यातील प्रत्‍येक टप्‍प्‍यावर महाराजांकडून प्रेरणा घेऊ शकतो. त्‍यांच्‍याप्रमाणे आपणही बालवयापासून सद़्‍गुणांची कास धरली, तर कोणत्‍याही कठीण प्रसंगाला आपण तोंड देऊ शकतो.’’ या वेळी त्‍यांनी छ. शिवाजी महाराजांच्‍या जीवनातील विविध प्रसंग आणि महाराजांचे गुण सांगितले. प्रोजेक्‍टरच्‍या माध्‍यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या गड-दुर्गांची, तसेच स्‍वातंत्र्यसंग्रामातील क्रांतीकारकांची महत्त्वपूर्ण माहिती विद्यार्थ्‍यांना दाखवण्‍यात आली.

या वेळी ७० विद्यार्थी आणि १० शिक्षक सहभागी झाले होते. विद्यार्थ्‍यांनी देशभक्‍तीने प्रेरित होऊन याविषयी आत्‍मीयतेने प्रश्‍न विचारले. उपस्‍थित शिक्षकांनीही या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्‍यांमध्‍ये इतिहासाविषयी जागरूकता निर्माण करण्‍याच्‍या प्रयत्नांचे स्‍वागत केले. कार्यक्रमाच्‍या यशस्‍वी आयोजनासाठी शाळेच्‍या प्रशासनाने समाधान व्‍यक्‍त करत ‘भविष्‍यात अशा प्रकारच्‍या उपक्रमांचे आयोजन करू’, असे सांगितले.