Jitendra Narayan Tyagi : श्रीनगर न्यायालयाने जितेंद्र नारायण त्यागी यांना अटक करून उपस्थित करण्याचा दिला आदेश  

इस्लाम आणि महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्याचे प्रकरण

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – येथील न्यायालयाने जितेंद्र नारायण त्यागी (पूर्वाश्रमीचे वसीम रिझवी) यांना अटक करण्याचा आदेश दिला आहे. महंमद पैगंबर आणि इस्लाम धर्म यांवर केलेल्या कथित वादग्रस्त टिपणीवरून न्यायालयाने हा आदेश दिला आहे. न्यायालयाने पोलिसांना त्यागी यांना अटक करून उपस्थित करण्यास सांगितले आहे. वारंवार समन्स बजावल्यानंतरही त्यागी न्यायालयात उपस्थित न राहिल्याने हा आदेश देण्यात आला. न्यायालयाने पोलिसांना २५ एप्रिल २०२५ पर्यंत अटक करून उपस्थित करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

१. जितेंद्र त्यागी यांच्याविरुद्ध वर्ष २०२१ मध्ये एका व्यक्तीने तक्रार केल्यानंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला होता. वर्ष २०२२ मध्ये चालू झालेल्या याप्रकरणात १० पेक्षा अधिक वेळा सुनावणी झाली आहे; परंतु या काळात जितेंद्र नारायण त्यागी न्यायालयात उपस्थित राहिले नाहीत.

२. जितेंद्र नारायण त्यागी यांचे पूर्वीचे नाव वसीम रिझवी होते. त्यांनी इस्लाम धर्म सोडून हिंदु धर्म स्वीकारला. यापूर्वी ते उत्तरप्रदेश शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्षही होते. जितेंद्र त्यागी इस्लामवरील टीकेमुळे सतत चर्चेत असतात. त्याच्याविरुद्ध इतर अनेक प्रकरणांमध्ये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.