गायरान भूमीवर होणार्‍या सौरऊर्जा प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध !

प्रतिकात्मक चित्र

सातारा, २२ फेब्रुवारी (वार्ता.) – खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथील गट क्रमांक ३२५ मधील १६ हेक्टर गायरान भूमीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाला राजाचे कुर्ले ग्रामस्थांचा विरोध आहे. या आशयाचे पत्र ग्रामस्थांनी मंडल अधिकारी यांना दिले आहे.

राजाचे कुर्ले ग्रामपंचायतीच्या वतीने भूजल स्तर वाढवण्यासाठी डोंगर पायथ्याला १७ कि.मी. आणि डोंगर माथ्यावर १८ कि.मी. खोल सलग समपातळीत चर खोदण्याचे काम लोकसहभागातून केले आहे. त्यामध्ये वृक्षारोपण करण्यात आले आहे. यावर्षीही वेगवेगळ्या १ लाख वृक्षांचे, तसेच आयुर्वेदिक वृक्षांचे वृक्षारोपण करण्याचे नियोजन केले आहे. हे वृक्षारोपण राजाचे कुर्ले ग्रामपंचायत आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने अन् मार्गदर्शनाखाली होणार आहे, तसेच यासाठी येणारा व्यय रोटरी क्लब यांच्या साहाय्याने करण्याचे ठरले आहे. गावातील गुरे, मेंढरे आणि शेळ्या या गायरान भूमीवर वर्षानुवर्षे चरत आहेत. शेतकरी बांधवांच्या उपजीविकेसाठी यामुळे साहाय्य होत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण आवश्यक आहे. सौरऊर्जा प्रकल्पासाठी येथील वृक्षतोड झाल्यास स्थानिक भूजलसाठा नष्ट होऊ शकतो. त्यामुळे ही गायरान भूमी हस्तांतरित करू नये, असे ग्रामस्थांनी पत्रात म्हटले आहे.