साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करून त्‍यांना साधनेच्‍या पुढच्‍या टप्‍प्‍यात नेणारा परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचा चैतन्‍यदायी सत्‍संग !

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष १९९० पासून अध्‍यात्‍मप्रसाराचे कार्य चालू केले. त्‍या अंतर्गत त्‍यांनी ‘आनंदप्राप्तीसाठी साधना’, या विषयावर अभ्यासवर्ग घेणे, विविध ग्रंथांचे संकलन करणे, अनेक मोठी प्रवचने करणे’, असे विविध मार्ग अवलंबले आहेत. आरंभापासून ‘जिज्ञासूंच्या शंकांचे निरसन करणे आणि ‘चांगला साधक कसे व्हावे ?’, याविषयी मार्गदर्शन करणे’, हा त्यांच्‍या कार्याचा एकमेव उद्देश होता. ‘साधकांच्या साधनेसंबंधी अडचणी समजून घेणे आणि त्यांचे निराकरण करून उपाय सांगणे’, हे त्यांच्‍या कार्याचे एक अविभाज्य अंग आहे. ‘बाळ बोबडे जरी बोले, बोल जननीस ते कळे ।’, या उक्तीप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांना साधकांच्या साधनेसंबंधी अडचणी लगेच कळतात आणि ते त्यांना अचूक उपायही सांगतात’, अशी अनुभूती अनेक साधकांनी घेतली आहे. या लेखात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पूर्वी विविध ठिकाणी केलेल्या मार्गदर्‍शनातील काही निवडक सूत्रे दिली आहेत. १८.२.२०२५ या दिवशी मार्गदर्शक सूत्रांतील काही भाग पाहिला. आज पुढील भाग पाहूया.         

 (भाग २)

लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा- https://sanatanprabhat.org/marathi/885593.html

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

 ६.  सेवा नव्‍हे, तर स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍या निर्मूलनासाठीचे प्रयत्नच आपल्‍याला ईश्‍वरापर्यंत घेऊन जातात !

श्री. अभिषेक पै : श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍या कृपेने मला सुप्रियाताई (सौ. सुप्रिया माथूर, आध्‍यात्मिक पातळी ६७ टक्‍के) घेत असलेल्‍या व्‍यष्‍टी साधनेच्‍या आढाव्यात बसण्याची संधी मिळाली होती. त्या वेळी मला आश्रमसेवा आणि धर्मप्रसारासाठीच्या माहितीजालासंबंधी सेवाही होत्या. त्या वेळी माझ्या मनात सेवेविषयीचे विचार अधिक असायचे. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेत आपल्या मनाचा अभ्यास करायचा असतो; पण मी त्यासाठी वेळ देत नव्हतो.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : तुम्‍ही जी सेवा करता, ती अन्‍य कोणीही करू शकतो; पण स्‍वतःला सुधारण्‍याची प्रक्रिया आपल्‍यालाच करावी लागते. दुसरे कोण करू शकणार ? आपल्याला ईश्वरापर्यंत जायचे आहे. त्यामुळे ‘ही सेवा चांगली आहे. ही सेवा चांगली केली. नवीन शोध लावला’, यापेक्षा ‘आपण सात्त्विक झालो’, हे महत्त्वाचे आहे.

श्री. अभिषेक पै : माझ्‍याकडून फार मोठी चूक झाली. मला प्रक्रियेतील आनंद मिळत नव्‍हता.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : ‘सेवा कधीही तुम्‍हाला ईश्‍वरापर्यंत घेऊन जाणार नाही; पण स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍या निर्मूलनाची प्रक्रियाच तुम्‍हाला ईश्‍वरापर्यंत घेऊन जाईल; म्‍हणून प्रक्रियेला अधिक महत्त्व आहे’, अशा आशयाची सूचना नेहमी स्वतःच्या मनाला द्या.

श्री. अभिषेक पै : मी त्‍या प्रक्रियेचा लाभ घेऊ शकलो नाही.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : ते सोडून द्या. तो भूतकाळ झाला. तुम्‍हाला हे समजले, हा वर्तमानकाळ ! आजपासून नाही, तर आतापासून चालू करा.

७. स्‍वतःच्‍या मनातील विचार व्‍यक्‍त करून स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍या निर्मूलनाच्‍या प्रक्रियेत सहभागी व्‍हायला हवे !

श्री. अभिषेक पै : हो. आता मी प्रार्थना करतो, ‘आता हातात जो वेळ आहे, त्यात माझी प्रक्रियाही होऊ दे आणि माझ्या मनातील विचार योग्य आहेत कि नाही ? ते तुमच्या चरणी समर्पित करण्याच्‍या योग्यतेचे आहेत कि नाही ?’, हे माझ्या लक्षात येऊ दे.’

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : असे नाही. आपले विचार व्‍यक्‍त करून प्रक्रियेत सहभागी व्‍हायला हवे. समजले का ?

श्री. अभिषेक पै : हो.

८. न्‍यूनगंडाचा विचार मनात येताच स्‍वतःला चिमटा काढा !

श्री. शशांक सिंह : मी एका साधिकेशी बोललो. त्‍यांनी मला चिंतन करायला सांगितले. तेव्‍हा माझ्‍या लक्षात आले की, माझ्‍यात न्‍यूनगंड आहे आणि ही गोष्ट माझ्या लक्षातच येत नव्हती. ‘माझ्यातील न्यूनगंडामुळे मी सर्व गोष्टी लपवत होतो’, असे मला वाटते.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : न्‍यूनगंडाचा विचार मनात आला, तर लगेच स्‍वतःला चिमटा काढा. न्‍यूनगंडाचा विचार दूर करण्‍यासाठी स्‍वयंसूचना द्या. त्‍याविना सुधारणार कसे ? नंतर न्‍यूनगंड निघून जाईल. आपल्याला प्रत्येक स्वभावदोषाच्या मुळापर्यंत जायचे आहे, तरच तो स्वभावदोष जातो.

९. प्रसंग घडल्‍यावर स्‍वतःच्‍या मनाने काही न करता नेहमी इतरांना विचारा !

श्री. शशांक सिंह : जेव्‍हा प्रसंग घडतात, तेव्‍हा माझ्‍या लक्षात येत नाही की, ते कधी स्‍वीकारायचे आणि कधी सांगायचे ?

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : नेहमी इतरांना विचारा. जेव्‍हा रुग्‍ण वैद्यांकडे जातो, तेव्‍हा तो स्‍वतः विचार करत नाही, ‘मी कोणती गोळी घेऊ ?’ हे तसेच आहे.

१०. स्‍वभावदोष अधिक असल्‍यास मनातील विचारांचे मूळ कारण लक्षात येण्‍यासाठी स्‍वयंसूचना द्या !

श्री. शशांक सिंह : कधी कधी असे होते की, मी अधिक सांगू लागतो. मला अपेक्षित असे उत्तर मिळेपर्यंत मी विचारत रहातो. तेथे मला स्‍वतःला थांबवता येत नाही.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : ‘काय होते ?’, हे तुमच्‍याही लक्षात येत नाही !

श्री. शशांक सिंह : घडलेल्‍या प्रसंगाविषयी मी साधकांना विचारतो. त्‍या वेळी समोरचा साधक वेगळेच काहीतरी सांगतो. तेव्‍हा मला वाटते, ‘कदाचित् मी त्‍यांना व्‍यवस्‍थित सांगू शकत नाही; म्‍हणून ‘मला काय सांगायचे आहे ?’, हे त्‍यांच्‍या लक्षात येत नाही.’ मग मी प्रतिदिन स्‍वतःच्‍या विचारांत रहातो. तेव्‍हा ‘काय बोलायला  पाहिजे ?’, हे मला कळत नाही; म्‍हणून मी माघार घेतो; मात्र माझ्‍या मनात विचार चालू असतात. ते मनातून जात नाहीत.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : जेव्‍हा स्‍वभावात दोष अधिक असतात, तेव्‍हा समज अल्‍प असते. त्‍यासाठी वेगळी काही सूचना देण्‍याची आवश्‍यकता नाही. ‘प्रसंग घडल्‍यानंतर विचारांचे मूळ कारण माझ्‍या लक्षात येईल’, अशा आशयाची स्वयंसूचना देऊ शकता. या स्वयंसूचनेमुळे विचारांचे मूळ कारण लक्षात येईल. अंतर्मनातील मूळ कारण बाह्यमनात येईल. ते लिहून त्यावर सूचना द्या.

११. प्रत्‍येक चुकीच्‍या मुळापर्यंत जाऊन चूक होण्‍याचे कारण दूर करा !

श्री. शशांक सिंह : सेवा करतांना ‘सेवा पूर्ण झाली नाही; म्‍हणून असे झाले’, असे मला वाटते. मग माझ्‍याकडून मनोराज्‍यात रमणे होते. माझे मन कल्‍पनांमध्‍ये बुडून जाते. ‘आता अमुक-तमुक होणार’, असे विचार माझ्‍या मनात येतात. त्‍यामुळे माझ्‍याकडून गुणसंवर्धनाकडे लक्ष दिले जात नाही.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : याच्‍या मुळापर्यंत जा. ‘सेवा पूर्ण का झाली नाही ?’, त्‍याचे कारण माझ्‍या लक्षात येईल’, अशा आशयाची स्‍वयंसूचना द्या. एक-एक कारण दूर केले, तर मनात काही रहाणारच नाही. (साधकांना उद्देशून) हे चांगला अभ्‍यास करून आले आहेत आणि यांनी सूत्रेही लिहून आणली आहेत, म्हणजे हे प्रयत्न चांगले करतील.

(क्रमशः)

लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा- https://sanatanprabhat.org/marathi/889496.html