परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष १९९० पासून अध्यात्मप्रसाराचे कार्य चालू केले. त्या अंतर्गत त्यांनी ‘आनंदप्राप्तीसाठी साधना’, या विषयावर अभ्यासवर्ग घेणे, विविध ग्रंथांचे संकलन करणे, अनेक मोठी प्रवचने करणे’, असे विविध मार्ग अवलंबले आहेत. आरंभापासून ‘जिज्ञासूंच्या शंकांचे निरसन करणे आणि ‘चांगला साधक कसे व्हावे ?’, याविषयी मार्गदर्शन करणे’, हा त्यांच्या कार्याचा एकमेव उद्देश होता. ‘साधकांच्या साधनेसंबंधी अडचणी समजून घेणे आणि त्यांचे निराकरण करून उपाय सांगणे’, हे त्यांच्या कार्याचे एक अविभाज्य अंग आहे. ‘बाळ बोबडे जरी बोले, बोल जननीस ते कळे ।’, या उक्तीप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांना साधकांच्या साधनेसंबंधी अडचणी लगेच कळतात आणि ते त्यांना अचूक उपायही सांगतात’, अशी अनुभूती अनेक साधकांनी घेतली आहे. या लेखात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विविध ठिकाणी केलेल्या मार्गदर्शनातील काही निवडक सूत्रे दिली आहेत. १९.२.२०२५ या दिवशी आपण या लेखाचा दुसरा भाग पाहिला. आज अंतिम भाग दिला आहे.
(भाग ३)
लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा- https://sanatanprabhat.org/marathi/885874.html

१२. स्वभावदोष दूर केल्यावरच नामजप एकाग्रतेने होतो !
एक साधिका : प.पू. गुरुदेव, मला माझ्या मुलाची काळजी वाटते. तो मन लावून सेवा करतो; पण मन लावून नामजप करत नाही.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : मोठी माणसेही मन लावून नामजप करू शकत नाहीत, तर लहान मुलांकडून काय अपेक्षा करणार ? जेव्हा स्वभावदोष दूर होतील, तेव्हाच नामजप एकाग्रतेने आणि भावपूर्ण होईल. तोपर्यंत होणार नाही.
१३. नामजप करतांना मनात अन्य विचार येण्यापेक्षा आपोआप होणारा नामजप करणे श्रेयस्कर आहे !
श्री. अरविंद पानसरे : प.पू. गुरुदेव, पुष्कळ वेळा माझा ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’, हा नामजप आपोआप चालू होतो. त्या वेळी मला वाटते, ‘उपायांसाठी सांगितलेला नामजप केला पाहिजे. मी तो नामजप करतो; पण पुन्हा माझा ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’, हा नामजप चालू होतो.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : तोच चालू ठेवा. ‘रामराज्य’ तर आणायचेच आहे ना ! मूलभूत शास्त्र काय आहे ? इतर विचार मनात येण्यापेक्षा एका विचारावर मन एकाग्र होणे, म्हणजे नामजप !
१४. स्वतःला दिलेली सेवा सकारात्मक विचार करून चांगल्या प्रकारे करणे महत्त्वाचे आहे !
श्री. अभिषेक पै : परम पूज्य, सेवा करत असतांना माझ्या मनात पुढील विचार असतात, ‘तुम्ही इतके ग्रंथ लिहीत आहात, ते लवकरात लवकर समाजापर्यंत पोचायला हवेत. लोकांनी ते स्वीकारायला हवेत आणि समाजाला त्यांचा लाभ व्हायला हवा’; पण एखादा लेख संकेतस्थळावर अपेक्षित असा नसेल, तर माझ्यातील ‘अपेक्षा करणे’, या अहंच्या पैलूमुळे मला वाटते, ‘त्यात सुधारणा करायला हवी. आपण यात न्यून का पडतो ?’ या विचारांमुळे मी पुष्कळ अस्थिर होतो. त्यासाठी मी प्रयत्न करत आहे. पूर्वी काही करत नव्हतो. स्वतःच्या स्तरावरच साधकांना ‘आपण येथे न्यून पडतो’, असे सांगत होतो.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : तुमच्या सेवेचे स्वरूप काय आहे ? आलेले लेख संकेतस्थळावर ठेवणे (अपलोड करणे) कि लेख लिहिणे ?
श्री. अभिषेक पै : ‘लेख संकेतस्थळावर ठेवणे (अपलोड करणे)’, ही सेवा आहे.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : जे लेख चांगल्या गुणवत्तेचे नाहीत, त्यांविषयी विचार कसा असायला हवा ? पूर्वी आपल्याकडे संकेतस्थळावर ठेवण्यासाठी एकही लेख नव्हता. आता थोडे थोडे लेख येत आहेत. जसजसा काळ जाईल, तसतसे आणखी चांगले लेख येतील. त्यांची संख्या वाढेल आणि गुणवत्ताही चांगली असेल. त्याविषयी चिंता करायला नको. आपण आपली सेवा चांगली करतो ना ! बस. समजले ना ?
श्री. अभिषेक पै : हो. ‘त्यासह त्यात काही सुधारणा करू शकत असू, तर ते उत्तरदायी साधकांना लिहून देणे’, असाही प्रयत्न करत आहे.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : बस ! अधिक विचार करायचा नाही.
१५. आपत्काळात गुरूंवर श्रद्धा ठेवून प्रत्येक सेवा करणे आवश्यक आहे !
श्री. अभिषेक पै : ‘पुढे आपत्काळाची तीव्रता वाढणार आहे. कोणत्या साधकांनी कोणते प्रयत्न करायला हवेत, ज्यायोगे त्यांना आपत्काळ सुसह्य होईल ?’, असे पुष्कळ विचार माझ्या मनात येत होते. त्या वेळी ‘तुम्हीच सर्वांना आपत्काळातून बाहेर काढणार आहात’, ही माझी तुमच्यावरील श्रद्धा न्यून पडली. माझ्या मनातील वरील विचार पुष्कळ वाढले. माझ्या मनातील हे िवचार केवळ माझे आई-वडील किंवा नातेवाईक यांच्याविषयी नव्हते, तर सर्व साधकांविषयी होते. ‘आपण काय करू शकतो ? आणखी काही अभ्यास करू शकतो का ? बाहेरून काही माहिती मिळू शकते का, जी आपण सर्वांपर्यंत पोचवू शकू ?’, या विचारांमध्ये माझे काही दिवस वाया गेले.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : काही विचारच करायचा नाही; कारण आपले ज्ञानप्राप्तकर्ते साधक सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) आणि श्री. राम होनप यांना जे ज्ञान प्राप्त होते, ते कोणत्या गुणवत्तेचे आहे ? ऋषिमुनींनी वेद, उपनिषदे आणि पुराणे, हे सर्व लिहिले आहेत. आपल्या साधकांना मिळणारे ज्ञान त्या प्रतीचे आहे. त्या वेळी ऋषिमुनींनी सांगितलेले सर्वांना मान्य असायचे. त्याविषयी काही दुमत नसायचे. या कलियुगात आपल्याला हे ३ ज्ञानप्राप्तकर्ते साधक मिळाले आहेत. त्यांचे कार्य अनेक शतके आणि सहस्रो वर्षे चालू राहील; कारण आता ‘कलियुग’ हे विज्ञानाचे युग आहे. ‘का आणि कसे ? (How and why ?)’, याचे उत्तर द्यावे लागते. या सर्व प्रश्नांची उत्तरे या ३ ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांकडे तयार आहेत. त्यांचे पुष्कळ ग्रंथ होणार आहेत; पण आता आपत्काळ असल्याने आपण त्यांना अधिक वेळ देऊ शकत नाही. ‘मी आणखी काय करू ? काय लिहू ?’, हा विचारच करायचा नाही. आपल्याकडे लिहिलेले सर्व तयार आहे.
श्री. अभिषेक पै : हीच अनुभूती मला आली. काही दिवसांनी अकस्मात् माझ्या विचारांत पालट झाला. कर्ता-करविता आपणच आहात ना ! तर मला त्याची काळजी करण्याची काही आवश्यकता नाही.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : पुष्कळ छान ! ईश्वर कसे शिकवतो ना !
श्री. अभिषेक पै : हे विचार मी माझ्या आई-वडिलांना सांगणारच होतो, तेवढ्यात मला त्यांचाच भ्रमणभाष आला आणि त्यांनी मला सांगितले, ‘‘आमची काळजी करण्याचे काही कारण नाही; कारण मंगळुरू येथील पू. रमानंदअण्णा (सनातनचे ७५ वे संत पू. रमानंद गौडा, वय ४८ वर्षे) यांनी स्वतःहून आम्हाला भ्रमणभाष केला आणि आमची विचारपूस केली.’’ तेव्हा ‘माझे विचार अयोग्य होते आणि माझी श्रद्धा न्यून पडत होती’, हे माझ्या लक्षात आले.
(समाप्त)