परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष १९९० पासून अध्यात्मप्रसाराचे कार्य चालू केले. त्या अंतर्गत त्यांनी ‘आनंदप्राप्तीसाठी साधना’, या विषयावर अभ्यासवर्ग घेणे, विविध ग्रंथांचे संकलन करणे, अनेक मोठी प्रवचने करणे’, असे विविध मार्ग अवलंबले आहेत. आरंभापासून ‘जिज्ञासूंच्या शंकांचे निरसन करणे आणि ‘चांगला साधक कसे व्हावे ?’, याविषयी मार्गदर्शन करणे’, हा त्यांच्या कार्याचा एकमेव उद्देश होता. ‘साधकांच्या साधनेसंबंधी अडचणी समजून घेणे आणि त्यांचे निराकरण करून उपाय सांगणे’, हे त्यांच्या कार्याचे एक अविभाज्य अंग आहे. ‘बाळ बोबडे जरी बोले, बोल जननीस ते कळे ।’, या उक्तीप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांना साधकांच्या साधनेसंबंधी अडचणी लगेच कळतात आणि ते त्यांना अचूक उपायही सांगतात’, अशी अनुभूती अनेक साधकांनी घेतली आहे. या लेखात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पूर्वी विविध ठिकाणी केलेल्या मार्गदर्शनातील काही निवडक सूत्रे दिली आहेत.
(भाग १)

१. साधनेमुळे आनंद मिळाल्यानंतर साधना वाढवण्यासाठी प्रयत्न होतात !
एक साधिका : मी व्यष्टी साधना आणि सेवा या दोन्हींची सांगड घालण्याचा प्रयत्न करत आहे. पूर्वी मला ‘हे माझे स्वभावदोष आहेत कि अहंचे पैलू आहेत ? ते दूर करण्यासाठी कोणते प्रयत्न करायला हवेत ?’, हे काहीच कळत नव्हते. पूर्वीच्या तुलनेत आता मला माझ्यातील स्वभावद़ोष आणि अहं यांचे पैलू लक्षात येत आहेत अन् ते दूर करण्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत. तुम्ही (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) सांगितल्याप्रमाणे उत्तरदायी साधकांना स्वभावदोष-निर्मूलन सारणी दाखवणेही चालू केले आहे; पण माझ्याकडून अपेक्षित असे प्रयत्न होत नाहीत.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : जेव्हा आपण करत असलेल्या साधनेतून आपल्याला आनंद मिळू लागतो, तेव्हाच आपले साधनेचे प्रयत्न चालू होतात. साधनेच्या आरंभी आनंद मिळत नाही. १० – १५ वर्षांनंतर आनंदाची अनुभूती येऊ लागते. नंतर कोणी साधना सोडत नाही. साधक साधनेचे प्रयत्न वाढवतात आणि ईश्वरप्राप्तीपर्यंत प्रयत्न आणखी वाढवतात.
२. वैयक्तिक कामे कितीही असली, तरी साधकांशी बोलून त्यांना साधनेत साहाय्य करणे आवश्यक आहे !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (डॉ. (सौ.) अरुणा सिंह यांना) : तुम्ही यांच्याशी (साधिकेशी) बोलता कि नाही ?
डॉ. (सौ.) अरुणा सिंह : आता मागील २ – ३ मासांपासून घराच्या कामाच्या निमित्ताने मी बाहेर आहे, नाहीतर थोडेफार बोलत होते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : परंतु भ्रमणभाषवर तर बोलू शकत होता ना ? घरातील कामे आहेत; म्हणून सोडून दिले, असे कसे ? जे संपूर्ण भारतात फिरतात, तेही म्हणत नाहीत की, आता मी बाहेरील राज्यात आहे. त्यामुळे मी साधकांशी बोलू शकत नाही. आता तुम्ही यांच्या साधनेचा नियमितपणे आढावा घ्या. आरंभी प्रतिदिन आढावा घ्या.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (साधिकेला उद्देशून) : तुम्ही त्यांना (डॉ. (सौ.) अरुणा सिंह यांना) ‘तुमचे सारणी लिखाण होते का ?’, हे प्रतिदिन सांगा. काही मास असे केल्यानंतर आठवड्यातून २ वेळा सांगा. नंतर आठवड्यातून एकदा सांगा. नंतर तुमच्याकडूनच तसे प्रयत्न होतील.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (डॉ. (सौ.) अरुणा सिंह यांना उद्देशून) : हे तुमचे दायित्व आहे.
३. साधकाच्या व्यष्टी साधनेत सातत्य आल्यामुळे त्याला मनाची स्थिरता अनुभवता येणे
श्री. सुनील घनवट : मागील ६ मासांपासून मला अनुभवास येत आहे, ‘समष्टी साधना करता करता माझी व्यष्टी साधना करण्याची गोडी आपोआप वाढत आहे.’
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : अरे वा ! आता तुम्ही जिंकलात !
श्री. सुनील घनवट : तुमच्या कृपेमुळे ! सद़्गुरु काकांना (हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना) साधनेच्या प्रयत्नांचा आढावा देणे चालू होते. तेव्हा माझ्या लक्षात आले की, मी मागील २० वर्षांपासून साधना करत आहे; पण गुरुदेवा, या ६ मासांत सारणी लिखाणामध्ये सातत्य आणि साधनेचा आढावा देण्याचे प्रयत्न तुमच्याच कृपेने झाले. त्यामुळे ६ मासांपासून मी मनाची स्थिरता अनुभवत आहे.
४. साधनेमध्ये प्रगती करणार्या साधकाच्या वाणीमध्ये चैतन्य असल्याने त्याच्या बोलण्याचा परिणाम समाजावर होऊन समाज साधना करू लागतो !
श्री. हर्षद खानविलकर : सध्या महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. महिलांनी प्रतिकार करणे आरंभ केले, तर त्यांना त्रास देण्याचे कुणाचे धाडस होणार नाही. महिलांनी प्रतिकार करण्याची आणि लढण्याची वृत्ती वाढवली, तर त्या लढू शकतात. हिंदु जनजागृती समितीच्या स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गात महिलांचाही प्रतिसाद वाढत आहे. त्यांची सिद्धता आमच्यापेक्षा अधिक आहे.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (सत्संगातील साधकांना उद्देशून) : आता तुम्ही यांचे बोलणे ऐकत आहात. १ – २ वेळा श्वास घेऊन बघा. काही गंध येतो का ? कुणाकुणाला गंध आला ? ज्यांना गंध आला, त्यांनी आपला हात वर करा. (‘सत्संगातील अनेक साधकांना गंध आला.’ संकलक)
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (श्री. हर्षद यांना उद्देशून) : आता तुमच्या वाणीमध्ये चैतन्य आले आहे. त्याचा परिणाम ऐकणार्यांवर होऊन ते साधना करण्यासाठी सिद्ध होत आहेत. मागील १० वर्षांत आपल्या साधकांनी पुष्कळ चांगले प्रयत्न केले आहेत ना ! १० – १५ वर्षांपूर्वी काय फळ मिळाले ? काही नव्हते ना ? आता काळ आला आहे आणि बोलण्यात चैतन्य असणार्या साधकांचीही आवश्यकता आहे. चैतन्य असणारे म्हणजे साधना करणारे आणि साधनेत पुढे जाणारे आपल्याला हवे आहेत. देवाने तुमच्या रूपात चांगला साधक दिला आहे.
५. काळानुसार ईश्वर सर्वकाही करणारच असला, तरी त्यालाही माध्यम हवे !
श्री. हर्षद खानविलकर : गुरुदेव, आपल्याच कृपेने अध्यात्मप्रसाराची गती वाढत आहे. २ दिवसांपूर्वी धर्मप्रेमींचा सत्संग झाला. जे धर्मप्रेमी त्या सत्संगात आले होते, त्यांनी २ दिवसांत जिज्ञासूंना संपर्क केले आणि आता त्याच संपर्कांतून सत्संग आयोजित होऊ लागले आहेत. पूर्वी असे कधी झाले नव्हते. काळानुसार हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्याची आवश्यक अशी गती आहे; म्हणून हे होत आहे. आम्हाला पूर्वी वाटायचे, ‘लोकांना कसे सांगणार ? त्यांच्याकडून साधना कशी करून घ्यायची ?’ त्यानंतर आमच्या लक्षात आले की, आम्हीच तेथे न्यून पडत होतो. कार्याच्या या गतीवरून ‘आता परिवर्तनाचा काळ चालू होत आहे’, असे मला वाटते. समाजात परिवर्तन होत आहे. ईश्वराच्या कृपेने साधकांकडून अध्यात्मप्रसाराचे वेगवेगळे प्रयत्न होत आहेत, तसेच त्यांना वेगवेगळे उपक्रम सुचत आहेत. उत्तर भारतातही आता महिलांसाठी स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू झाले आहेत. एकदा महिलांचे मनोगत सांगण्याचे सत्र होते. त्यात तरुणींनी जे काही अनुभव सांगितले, ते प्रायोगिक स्तरावरचे होते. दैवी कृपेनेच हे पालट केवळ ७ दिवसांत झाले. इतके पालट कुणामध्ये खासगी कराटेच्या वर्गाला जाऊनही होत नाहीत.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : तुम्ही कालमाहात्म्याविषयी बोलत आहात ना ! त्यात महत्त्वाची गोष्ट, म्हणजे काळानुसार ईश्वर सर्वकाही करणारच आहे; पण त्यालाही कुणीतरी माध्यम हवे ना ! तो कुणाच्या माध्यमातून करणार ? देवाने तुम्हाला निवडले आहे. आपोआप काही होत नाही. काळ आला आहे; म्हणून असे झाले का ? तर नाही. तेथे कुणीतरी करणारा असतो.
पुष्कळ छान !
(क्रमशः)
___________________________________________________
लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा- https://sanatanprabhat.org/marathi/885874.html