‘सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या समवेत मला २० ते २३ जानेवारी २०२५ या कालावधीत उत्तरप्रदेशामधील प्रयागराज येथे भरलेल्या महाकुंभाचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. हा माझ्यासाठी एक दुग्धशर्करायोगच होता ! एक म्हणजे १४४ वर्षांनी आलेल्या महाकुंभला जायचा योग आला आणि दुसरे म्हणजे आध्यात्मिक उत्तराधिकारी असलेल्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या समवेत जायला मिळाले. त्यामुळे ‘देव मला किती भरभरून देत आहे’, याविषयी मी कृतज्ञता व्यक्त करत होतो. महाकुंभाचे पावन वातावरण, तसेच श्रीसत्शक्ति आणि श्रीचित्शक्ति यांच्या सान्निध्यामुळे आपोआपच मिळणारे अमृततत्त्व यांचा लाभ होण्यासाठी अन् त्यामध्ये चिंब भिजता येण्यासाठी मी वारंवार प्रार्थना करत होतो. – (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ
१. देहली ते प्रयागराज या विमानप्रवासात विमानाचे वैमानिक लोकसभेतील भाजपचे खासदार राजीव प्रताप रूडी असणे
प्रयागराज येथे जाण्यासाठी आम्ही देहली विमानतळावर विमानात बसलो. विमानप्रवासाला आरंभ होण्यापूर्वी विमानचालकाने (पायलटने) स्वतःची ओळख करून दिली. ते म्हणाले, ‘‘मी राजीव प्रताप रूडी. मी विमानाचा वैमानिक आहे, तसेच मी बिहारमधील सारण जिल्ह्यातून निवडून आलेला लोकसभेचा खासदारही आहे.’’ आम्हाला आश्चर्य वाटले. देवाने आमचे विमान प्रयागराजला पोचवण्यासाठी त्यांचे नियोजन केले होते ! त्यांनी प्रयागराज येथील महाकुंभाची थोडक्यात महती सांगितली आणि ‘आपले विमान त्या पवित्र क्षेत्राच्या वरून जाणार आहे’, हेही आवर्जून सांगितले.
२. प्रयागराज नगरी नटली असणे
आम्ही प्रयागराज विमानतळावर उतरलो. विमानतळावरचे वातावरण महाकुंभमय होते. विमानतळावर कुंभमेळ्याचे वेगवेगळे मोठे फलक लावलेले होते. छताला ठिकठिकाणी गोलाकारात कुंभाच्या आकृती आणि कुंभमेळ्याची छायाचित्रे लटकवलेली होती. विमानातून उतरलेले बहुतांश यात्रेकरू कुंभमेळ्यासाठी आलेले असल्याने त्यांनी काही ना काही भगवे वस्त्र घातलेले होते, उदा. भगव्या रंगाची टोपी, शाल, अंगरखा, धोतर इत्यादी. यासह सगळ्यांच्या चेहर्यावर उत्साह आणि आनंद होता. त्यामुळे विमानतळावरचे वातावरण प्रसन्न होते. अनेक जण कुंभमेळ्याच्या फलकांसमोर उभे राहून स्वत:ची छायाचित्रे काढून घेत होते.
विमानतळाबाहेर आल्यावर आम्ही चारचाकीने कुंभमेळ्याकडे जायला निघालो. रस्तेही कुंभमेळ्याला अनुकूल असे नटलेले आणि रंगरंगोटी करून सजलेले होते. रस्त्यांवर दुतर्फा उंच खांब उभे करून त्यांवर कुंभ बनवून ठेवलेले होते. शहरातील रस्ते महाकुंभाला आलेल्या लोकांनी आणि वाहनांनी गजबजलेले होते. अशा प्रकारे प्रयागराज शहरातील वातावरण महाकुंभमय झालेले होते.

३. देवाने प्रयागराज येथील थंडी आम्हाला सोसेल, अशी ठेवली असणे
प्रयागराजला जाण्याअगोदर आम्ही १५ ते १९ जानेवारी या कालावधीत जोधपूर आणि जयपूर येथे होतो. तेथे पुष्कळ थंडी होती. आम्ही गोव्याहून तेथे गेलो होतो. गोव्याला विशेष थंडी पडत नाही. जानेवारी हा मास (महिना) पुष्कळ थंडीचा असतो. जोधपूर आणि जयपूर येथे तापमान रात्रीपासून ते सकाळी १० वाजेपर्यंत ८ ते १० डिग्री सेल्सियस होते. पुढे दिवसभर तापमान २ – ३ डिग्रीने वाढत असले, तरी थंडगार वारे वहातच असतात. त्यामुळे आम्हाला बरीच थंडी वाजत होती. प्रयागराज येथील तापमान असेच थंड असते, तसेच नदीवरून वहाणार्या वार्यामुळे ते आणखी बोचरे वाटते. जोधपूर आणि जयपूर येथे राहून आम्हाला थंडीचा थोडा सराव झाला होता. आम्ही २० जानेवारी या दिवशी दुपारी ३ वाजता प्रयागराजला पोचलो आणि काय आश्चर्य ! तेथील तापमान १६ – १७ डिग्री सेल्सियस होते. देवाने आमच्यासाठी तेथील तापमान ५ डिग्रीने वाढवले होते. कुंभमेळ्यामध्ये सेवा करणारे सनातन संस्थेचे साधक म्हणाले, ‘‘कालपर्यंत येथे पुष्कळ थंडी होती. धुक्यामुळे आकाशात सूर्याचे दर्शन सकाळी १० नंतरच व्हायचे; पण आज आकाशात सूर्य सकाळी ७ वाजताच दिसला. त्यामुळे थंडी थोड्या प्रमाणात पळाली.’’ आम्ही महाकुंभ येथे असेपर्यंत, म्हणजे पुढील २ दिवस तेथील तापमान देवाने आम्हाला सोसेल एवढेच थंड ठेवले होते. त्यामुळे आम्हाला भव्य अशा महाकुंभमेळ्याचे आणि त्रिवेणी संगमाचे दर्शन घेता आले.
४. वर्ष २०२५ मध्ये सनातन संस्थेचे कार्य आध्यात्मिकदृष्ट्या एवढे उत्तुंग झाले आहे की, सनातन संस्था हिंदुत्वनिष्ठ आणि मान्यवर संत यांच्या हृदयात वसली असणे
वर्ष २०१५ मध्ये नाशिक (महाराष्ट्र) येथे कुंभमेळा भरला होता. त्या कुंभमेळ्याचे फ्लेक्स फलकावरील पुष्कळ मोठे छायाचित्र उत्तरप्रदेश सरकारने लावले होते. त्या छायाचित्रात कुंभमेळ्याची प्रचंड गर्दी दिसत होती आणि त्या गर्दीतही सनातन संस्थेचे १० ते १५ पिवळे फलक नावासहित स्पष्टपणे दिसत होते. त्या वेळी (वर्ष २०१५ मध्ये) सनातन संस्थेचे नाव कुंभमेळ्यामध्ये आलेल्या भाविकांना जागोजागी दिसून परिचित झाले. आता वर्ष २०२५ मध्ये, म्हणजे आणखी १० वर्षांनी पाहिले, तर सनातन संस्थेचे फलक जागोजागी लावायची आवश्यकता वाटत नव्हती; कारण सनातन संस्थेचे नाव भाविक, विविध आखाड्यांचे श्रीमहंत, मंडलेश्वर आणि महामंडलेश्वर यांच्या मुखात होते. सनातन संस्थेचे कार्य आध्यात्मिकदृष्ट्या एवढे उत्तुंग झाले होते की, संस्था या सर्वांच्या हृदयात वसली होती. सनातन संस्थेचे नाव सांगितले की, आखाड्यांचे प्रमुख, तसेच शंकराचार्य यांची भेट होऊ शकत होती. याचाच अर्थ ‘१० वर्षांपूर्वी सनातन संस्था लोकांना डोळ्यांनी दिसत होती (परिचित होती), तर तिने आता वर्ष २०२५ मध्ये लोकांच्या हृदयात स्थान मिळवले आहे !’
५. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या दोघींचा आध्यात्मिक अधिकार आखाड्यांचे श्रीमहंत किंवा महामंडलेश्वर यांना कळून येत असणे अन् ते त्या दोघींचा यथोचित सन्मान करत असणे
आम्ही कुंभमेळ्यात विविध आखाड्यांना भेटी दिल्या. त्यांनी उभारलेले तंबू भव्य जागेत होते. कुणाची १ एकर – २ एकर एवढी जागा होती, तर काही आखाड्यांची १० एकर एवढी विस्तीर्ण जागाही होती. आम्ही येणार असल्याचे आखाड्यांचे श्रीमहंत किंवा महामंडलेश्वर यांना आधीच कळवले होते. त्यांनी आमच्यासाठी वेळ राखून ठेवली होती. आम्ही आनंद आखाडा, निरंजनी आखाडा इत्यादी आखाड्यांचे दर्शन घेतले. आखाड्यांचे श्रीमहंत किंवा महामंडलेश्वर हे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ, तसेच सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांना ओळखत होते; पण सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना ते ओळखत नव्हते. असे असले, तरीही श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या दोघी समोर आल्यावर आखाड्यांचे श्रीमहंत किंवा महामंडलेश्वर हे त्या दोघींचा यथोचित सन्मान करत होते. त्या दोघींचा आध्यात्मिक अधिकार आखाड्यांचे श्रीमहंत किंवा महामंडलेश्वर यांना कळून येत होता. ते त्या दोघींना ‘आमच्या या पुढील कार्यक्रमाला या’, असे आवर्जून आमंत्रण देत होते.
आम्ही श्री स्वामी अवधेशानंद गिरिजी महाराज यांच्या आखाड्यात गेलो. त्यांचा आखाडा १० एकर परिसरात पसरलेला होता. ‘त्या आखाड्याचे व्यवस्थापन कसे केले आहे ?’, हे शिकता येण्यासाठी त्या आखाड्यांच्या व्यवस्थापकांना आम्ही आल्याचे साधकांनी सांगितले आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या दोघींचे छायाचित्र दाखवले. तेव्हा ते व्यवस्थापक म्हणाले, ‘‘मीच त्या दोघींना भेटायला येतो. त्या दोघी कुठे आहेत ?’’ ते व्यवस्थापक आले आणि त्यांनी आखाड्याच्या व्यवस्थापनाची सर्व माहिती आम्हाला दिली.
महाकुंभमेळ्यामध्ये आम्ही जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणांचे दर्शन घेत होतो, तेव्हा सामान्य लोकही श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या दोघींना बघून थांबून भावपूर्ण नमस्कार करायचे.
६. गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या त्रिवेणी संगमाचे अद्भुत दर्शन
त्रिवेणी संगमाचे दर्शन घेऊन त्याची पूजा करण्यासाठी आम्ही एका यांत्रिक नावेला (‘मोटरबोट’ला) सांगून ठेवले होते; पण संगमाचे दर्शन घेण्यासाठी एक महनीय व्यक्ती आल्याने त्यांच्या सेवेत ती यांत्रिक नाव गेली होती. ‘दुसर्या कोणत्या नावेची सोय होते का ?’, यासाठी आम्ही प्रयत्न केले; पण ते निष्फळ ठरले. त्यानंतर एका हितचिंतक महनीय व्यक्तींची भेट झाली. त्यांना नावेविषयी विचारल्यावर, तसेच त्यांना सनातन संस्थेचे कार्य आणि संगमाच्या पूजेचा उद्देश सांगितल्यावर त्यांनी आम्हाला यांत्रिक नाव देऊ केली. त्या वेळी आम्हाला पुढील अनुभूती आल्या.
६ अ. अशक्य वाटत असतांनाही आम्हाला त्रिवेणी संगमावर जाण्यासाठी यांत्रिक नाव मिळाली.
६ आ. एका हितचिंतक महनीय व्यक्तींची नाव मिळाल्याने त्या नावेने आम्हाला त्रिवेणी संगमाच्या अगदी केंद्रबिंदूच्या ठिकाणी जाता आले. तेथे आमच्याखेरीज आणखी कुणीही नव्हते.
६ इ. त्रिवेणी संगमाच्या येथे गंगेचे पाणी पिवळसर आणि यमुनेचे पाणी हिरवट निळे दिसणे, जेथे त्या नद्यांचा संगम होतो, तेथे पांढरी रेष दिसणे अन् ‘ती पांढरी रेष म्हणजे गुप्त असलेली सरस्वती नदी आहे’, असे जाणवणे : तेथे गंगा आणि यमुना या नद्यांचा संगम स्पष्ट दिसत होता. गंगेचे पाणी पिवळसर आणि यमुनेचे पाणी हिरवट निळे होते. सरस्वती नदी गुप्त आहे. तिला सीतेने शाप दिल्याने ती भूमीखाली गेली आहे; पण जिथे गंगा आणि यमुना यांचा संगम होतो, तेथे एक पांढरी रेष दिसते. ‘ती पांढरी रेष म्हणजे सरस्वती नदी आहे’, असे जाणवते.
६ ई. गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांची जाणवलेली वैशिष्ट्ये
६ उ. त्रिवेणी संगमावर जेथे आम्ही नावेतून उतरलो, तेथे नद्यांचे एकत्र आलेले पाणी केवळ अर्धा फूट खोल (घोट्याच्या थोडे वरपर्यंत) असणे : त्यामुळे आम्हाला संगमात उतरून तेथे संगमाची पूजा करता आली, सूर्याला अर्घ्य देता आले आणि हिंदु राष्ट्राची स्थापना लवकर होण्यासाठी गंगा, यमुना अन् सरस्वती यांना प्रार्थना करता आली, तसेच संगमाचे तीर्थ अंगावर घेता आले. हे सर्व सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेनेच घडले.
७. कृतज्ञता
गुरुकृपेनेच मला महाकुंभमेळ्याच्या दर्शनासाठी जाता आले, तसेच मी त्याविषयीची ही सूत्रे लिहू शकलो, यासाठी मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या तिन्ही गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (८.२.२०२५)
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी त्रिवेणी संगमावर अर्पण केलेल्या दोन नारळांपैकी एक नारळ पुढे वहात जाणे अन् दुसरा पुन्हा त्या दोघींकडे येणे

श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी त्रिवेणी संगमाची पूजा करतांना दोघींनी प्रत्येकी एक नारळ अर्पण केला. तेव्हा एक नारळ नदीत पुढे वहात गेला आणि एक नारळ थोडा पुढे जाऊन पुन्हा मागे आला अन् दोघी उभ्या होत्या तेथे त्यांच्या पायांशी येऊन स्थिरावला. ‘त्या दोघींच्या पायांशी आलेला नारळ त्रिवेणी संगमाने आम्हाला प्रसाद म्हणून दिला’, असे आम्हाला जाणवले आणि आम्ही तो घेतला.
‘गंगा आणि यमुना या दोन्ही नद्यांनी पूजा स्वीकारली’, याची अनुभूती येणे : श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी त्रिवेणी संगमाची पूजा करतांना फुले अर्पण केली. तेव्हा काही फुले गंगेकडे गेली आणि काही फुले यमुनेकडे गेली, तसेच दोघींनी प्रत्येकी एक दिवा अर्पण केला. तेव्हाही त्यांतील एक दिवा गंगेकडे आणि दुसरा दिवा यमुनेकडे गेला. तेव्हा ‘दोन्ही नद्यांनी पूजा स्वीकारली’, असे आम्हाला जाणवले.
– सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ
कुंभमेळ्यात सनातन संस्थेने लोकांच्या मनमंदिरात घर करण्याची कारणे
१. सनातन संस्था अध्यात्मशास्त्राचा केवळ तात्त्विक भाग न सांगता प्रायोगिक भाग सांगण्यावर भर देते.
२. अध्यात्माचा प्रायोगिक भाग, म्हणजे ‘साधना नेमकी काय करायची ?’, हे सांगते.
३. साधनेमध्ये प्रत्येकाने त्याच्या वृत्तीत पालट होऊन ती सात्त्विक होण्यासाठी स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यावर भर देते.
४. जीवनातील दैनंदिन व्यवहार असो कि अर्थप्राप्तीसाठीचा व्यवहार असो, तो ईश्वरप्राप्तीचे ध्येय ठेवून करायला सांगते.
५. आचारधर्म शिकवते. त्यामुळे हिंदु संस्कृतीचे ज्ञान सर्वांना होते.
६. सेवाभाव, कृतज्ञताभाव आणि शरणागतभाव यांचे ज्ञान सर्वसामान्यांना नसते. ते देते.
७. त्याग आणि प्रीती ही हिंदु संस्कृतीची महत्त्वाची शिकवण साधनेअंतर्गत शिकवते.
८. अध्यात्म हे शास्त्र आहे आणि ते परिपूर्ण आहे. त्यामुळे अशी परिपूर्ण साधना केली की, स्वतःची आध्यात्मिक उन्नती होणारच ! तेव्हा स्वतःत काय पालट होतात, हेही उदाहरणांसहित सांगितले जाते. याचा प्रत्यक्ष पुरावा, म्हणजे सनातनचे साधक समोर असल्याने लोकांना ही साधना पटते.
अशी सर्वसामान्यांना समजेल आणि सहज जमेल अशी साधना सांगत असल्याने सनातन संस्थेने लोकांच्या मनात घर केले आहे.
महाकुंभमेळ्यामध्ये तळमळीने, त्यागी वृत्तीने आणि प्रतिकूल हवामानात समाजोद्धाराची समष्टी सेवा करणारे साधक धन्य आहेत ! ती त्यांची समष्टी तपश्चर्याच आहे !

महाकुंभमेळ्यात सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय या संस्थांनी प्रदर्शने लावलेली होती. त्या तिन्ही प्रदर्शनांच्या सेवेत सहभागी असलेल्या साधकांची एकूण संख्या सरासरी २२५ होती. हे साधक गेले ३० – ४० दिवस त्या क्षेत्री होते. काही साधक डिसेंबर २०२४ पासूनही पूर्वसिद्धतेसाठी आलेले होते. डिसेंबर आणि जानेवारी हे मास प्रयागराज येथे पुष्कळ कडाक्याच्या थंडीचे असतात. प्रदर्शनांच्या येथे सेवा करणार्या साधकांना रहाण्यासाठी मुख्य प्रदर्शनाच्या तंबूच्या परिसरात लहान लहान ३ – ४ तंबू बांधलेले होते. साधकांसाठी स्नानगृहे आणि शौचालये हेही छोट्या तंबूसारखेच होते. साधक ८ ते १० डिग्री सेल्सियस तापमान असलेल्या कडाक्याच्या थंडीत तंबूत रात्रभर रहायचे आणि सकाळी उठून सर्व आवरून प्रदर्शनस्थळी जायचे. प्रदर्शनस्थळीही थंडी असायचीच. असे असूनही सर्व साधकांच्या चेहर्यावर हास्य, उत्साह आणि आनंद होता. सेवा करणारे साधक तरुण होते, तसेच ५० – ६० वर्षांचेही होते. मास – दीड मास अशा प्रतिकूल वातावरणात रहायचे; महाकुंभमेळ्याचा आध्यात्मिक लाभ होण्यासाठी भाव, कृतज्ञताभाव, शरणागतभाव या स्तरांवर रहायचे, आपल्याकडून होणार्या चुकांकडे लक्ष द्यायचे, तसेच प्रदर्शनस्थळी आलेल्या जिज्ञासूंना साधना, ग्रंथ इत्यादींच्या संदर्भात माहिती सांगण्याची समष्टी साधनाही करायचे. ही खरे तर मोठी तपश्चर्याच होती. २० – २५ साधक अध्यात्मप्रसारासाठी, सनातनचे कार्य कुंभमेळ्यामध्ये आलेले लोक, साधू, संत, विविध संस्था यांना सांगण्यासाठी, ग्रंथविक्री करण्यासाठी दिवसभर फिरायचे. त्यांना पुष्कळ चालावे लागायचे, त्यांचे पुष्कळ बोलणे व्हायचे. असे असले, तरी त्यांच्याही चेहर्यावर आनंद दिसून येत होता. ‘गुरुच आपल्याकडून ही सेवा करवून घेत आहेत’, हा भाव त्यांच्यामध्ये होता. सर्व साधकांच्या चेहर्यावर समर्पणभाव दिसून येत होता. ‘एरव्ही केलेल्या साधनेच्या तुलनेत महाकुंभमेळ्यामध्ये केलेली साधना एक सहस्र पटींनी फलदायी ठरते’, हे सूत्र साधकांच्या मनात ठसलेले होते. सर्वसाधारणपणे महाकुंभामध्ये येणारे भाविक स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी येतात; पण साधकांच्या मनात समाजोद्धाराचा उद्देश होता. महाकुंभमेळ्यामध्ये तळमळीने, त्यागी वृत्तीने आणि प्रतिकूल हवामानात समष्टी सेवा करणारे साधक धन्य आहेत ! ती त्यांची समष्टी तपश्चर्याच आहे !!
– सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |