Sri Sri Ravi Shankar On World Happiness Index : संघर्ष चालू असणारे देश भारतापेक्षा आनंदात पुढे असल्याचे सांगणे हे आश्‍चर्यकारक !

‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी ‘जागतिक आनंद निर्देशांका’वर उपस्थित केला प्रश्‍न !

‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक श्री श्री रविशंकर

वॉशिंग्टन (अमेरिका) – भारताला जागतिक आनंद निर्देशांकात ११८ व्या स्थानावर दाखवण्यात आले आहे. ज्या देशांमध्ये किंवा क्षेत्रात संघर्ष चालू आहे, त्यांपैकी बरेच देश किंवा क्षेत्रे भारतापेक्षा खूप पुढे आहेत. अशा परिस्थितीत निर्देशांक खूपच आश्‍चर्यकारक आहे, अशा शब्दांत ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी या निर्देशांकावर प्रश्‍न उपस्थित केला आहे. ऑक्सफर्ड विद्यापिठाने प्रकाशित केलेल्या या निर्देशांकात भारताचे वर्णन पाकिस्तान, युद्धग्रस्त युक्रेन आणि पॅलेस्टाईन यांच्यापेक्षा अधिक निराश अन् असमाधानी म्हणून केले आहे. ‘असे जागतिक निर्देशांक खरोखरच तथ्यांवर आधारित आहेत का ?’, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे गेल्या वर्षी ७९ व्या क्रमांकावर असलेल्या भूतानला यावर्षी कोणताही क्रमांक मिळालेला नाही.

सध्या अमेरिकेच्या दौर्‍यावर असलेले श्री श्री रविशंकर यांनी वॉशिंग्टनमध्ये बोलतांना अनेक प्रश्‍नांची उत्तरे दिली. त्यांनी मानवी मूल्ये, जीवनशैली आणि भारतातील समस्यांविषयीही आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले की, संघर्षग्रस्त भागात रहाणार्‍या लोकांमध्ये अधिक संघटितपणा असण्याचा युक्तीवाद करण्यात आला आहे; परंतु आनंद निर्देशांकासाठी केवळ संघटितपणा पुरेसा नाही. आज भारतातील परिस्थिती खूपच चांगली आहे. गेल्या दशकात लक्षणीय सुधारणा झाल्या आहेत.

भारतातील मानवी मूल्ये खूप उच्च आहेत !

श्री श्री रविशंकर पुढे म्हणाले की, मी जगभर प्रवास केला आहे आणि पाहिले आहे की, भारतात मानवी मूल्ये खूप उच्च आहेत. मग ती करुणा असो, किंवा पाहुण्यांपर्यंत पोचण्याची पद्धत असो, लोक त्यांची संसाधने कशी सामायिक करतात, हे सर्वकाही अविश्‍वसनीय आहे. भारतात जर तुमच्या कुटुंबाला काही झाले, तर संपूर्ण गाव तुमच्या साहाय्यासाठी उभे राहील. अशा प्रकारचे सामाजिक बंधन देशात खूप प्रचलित आहे. अर्थात् देशातही समस्या आहेत; पण गेल्या दशकात खूप सुधारणा झाल्या आहेत. खरेतर, सुख किंवा दुःख हे गरिबीशी जोडलेले नाही.

संपादकीय भूमिका

  • जे संतांच्या लक्षात येते आणि ते उघडपणे याविषयी भूमिका घेतात, तशी भूमिका भारत सरकार का घेत नाही ?
  • पाश्‍चात्त्य देशांकडून प्रकाशित होणारे अशा प्रकारचे निर्देशांक हे बनावट असून त्याद्वारे भारतासारख्या देशांना हीन लेखण्याचा प्रयत्न केला जात आहे. याला आता भारतासह अन्य देशांनीही विरोध करणे आवश्यक आहे !
  • पाश्‍चात्त्य देशांची आनंदाची व्याख्या ही वस्तुत: भौतिक सुखाशी संबंधित आहे. हिंदु धर्मानुसार साधना केल्यानंतरच निर्भेळ आणि निर्मळ आनंद अनुभवायला मिळू शकतो. या आनंदाची पुसटशी कल्पनाही भौतिकतेत गुरफटलेल्या पाश्‍चात्त्यांना नाही, हेच खरे !