Security Alert To T Raja Singh : (म्हणे) ‘बुलेटप्रूफ गाडीचा उपयोग करा आणि सशस्त्र सुरक्षारक्षक ठेवा !’ – भाग्यनगर पोलिस

भाग्यनगर पोलिसांचा आमदार टी. राजासिंह यांना सल्ला !

आमदार टी. राजासिंह

भाग्यनगर (तेलंगाणा) – येथील गोशामहल विधानसभा मतदारसंघातील भाजपचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांना सतत ठार मारण्याच्या धमक्या येत आहेत. भाग्यनगर पोलिसांनी आमदार टी. राजा सिंह यांना मोटारसायकलवरून प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच त्यांनी बुलेटप्रूफ चारचाकी गाडीचा वापर करण्यासह बंदूकधारी सुरक्षारक्षक नेहमीस समवेत ठेवण्यास सांगितले आहे. या संदर्भात एक अधिकृत पत्र पोलिसांनी टी. राजा सिंह यांना दिले आहे.

मला बंदुकीचा परवाना का देण्यात आला नाही ? – टी. राजासिंह यांनी पोलिसांना सुनावले

आमदार टी. राजा सिंह यांनी पोलिसांच्या सल्ल्यावर म्हटले की, माझ्या मतदारसंघात अनेक झोपडपट्ट्या आणि अरुंद गल्ल्या आहेत, जिथे बुलेटप्रूफ गाडी चालवता येत नाही. लोकांसाठी सुलभ रहाणे, हे माझे नेहमीच प्राधान्य राहिले आहे. मोटारसायकल चालवल्याने मला त्यांना न दुखावता त्यांना जोडून रहाता येते. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे, जेव्हा मी सुरक्षेच्या कारणास्तव बंदुकीच्या परवान्यासाठी अर्ज केला, तेव्हा त्याच पोलिसांनी माझ्याविरुद्ध खटले असल्याचे कारण देत माझा अर्ज नाकारला. आणखी एक विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे प्रलंबित खटले असलेल्या अनेक लोकांना कोणत्याही आक्षेपाविना बंदुकीचे परवाने देण्यात आले होते; पण ते मला देण्यात आले नाहीत. (तेलंगाणा पोलिसांसाठी हे लज्जास्पद ! केंद्रीय गृहमंत्रालयाने तेलंगाणा पोलिसांना यावरून जाब विचारला पाहिजे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

पोलिसांनी फुकटचा सल्ला देण्याऐवजी स्वतःहून बुलेटप्रूफ गाडी आणि सशस्त्र सुरक्षारक्षक पुरवणे आवश्यक आहे. आमदारांच्या संदर्भात काँग्रेस सरकारचे पोलीस असे सांगत असतील, तर ते सर्वसामान्य लोकांचे तरी रक्षण कसे करणार ?