
नवी देहली – भारत सरकारला चीनच्या ‘होतान प्रीफेक्चर’ भागामध्ये २ नवीन तालुके स्थापन करण्याच्या चीनच्या घोषणेची जाणीव आहे. या तालुक्यांचा काही भाग भारताच्या लडाख या केंद्रशासित प्रदेशात येतो. चीन सीमावर्ती भागात पायाभूत सुविधा विकसित करत आहे, याची सरकारला जाणीव आहे. भारत सरकारने या क्षेत्रातील भारतीय भूभागावर चीनचे बेकायदेशीर नियंत्रण कधीही स्वीकारलेले नाही. नवीन तालुक्यांच्या निर्मितीमुळे या भूभागावरील भारताच्या सार्वभौमत्वाविषयी भारताच्या दीर्घकालीन आणि सातत्यपूर्ण भूमिकेवर परिणाम होणार नाही. चीनच्या बेकायदेशीर आणि बलपूर्वक नियंत्रणाला वैधता मिळणार नाही. याचा अर्थ असा की, भारत चीनच्या या हालचालीला अजिबात मान्यता देत नाही, असे परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिले. ‘भारताने राजनैतिक माध्यमातून या प्रकरणावर तीव्र निषेध नोंदवला आहे’, असेही मंत्र्यांनी स्पष्ट केले.
परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह पुढे म्हणाले की, भारताच्या सुरक्षेवर परिणाम करणार्या सर्व घडामोडींवर सरकार सतत लक्ष ठेवते आणि त्याच्या सार्वभौमत्वाचे अन् प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय करते. भारताच्या सीमा कोणत्याही परिस्थितीत सुरक्षित रहातील, याची निश्चिती करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. चीनच्या कोणत्याही दाव्यामुळे किंवा कृतीमुळे भारताची भूमिका पालटणार नाही. सीमावाद सोडवण्यासाठी भारत सरकार चीनशीही चर्चा करत आहे. तसेच ते आपल्या सीमांचे रक्षण करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे.
संपादकीय भूमिकाभारताने केवळ असे सांगू नये, तर ते नियंत्रण हटवण्यासाठी प्रयत्न काय करणार आणि कधी करणार, तेही जनतेला सांगून आश्वस्त केले पाहिजे ! |