मोगलांचे उदात्तीकरण करणार्‍या आणि राष्ट्रपुरुषांचा इतिहास दडपणार्‍या ‘एन्.सी.ई.आर्.टी.’चा हिंदुद्रोह उघड केला ! 

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या मुंबई आवृत्तीच्या २५ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने विशेष लेखमाला !

‘सनातन प्रभात’ नियतकालिकांची पत्रकारिता समाजाभिमुख आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून विविध सामाजिक, धार्मिक क्षेत्रांतील अपप्रवृत्तींच्या विरोधात ‘सनातन प्रभात’ने सातत्याने आवाज उठवला. शोध पत्रकारितेद्वारे ‘सनातन प्रभात’ने भ्रष्टाचार उघड केला. ‘सनातन प्रभात’मधील सत्य आणि वस्तूनिष्ठ वृत्तांकनामुळे अपप्रवृत्तींना प्रतिबंध बसला. या वृत्तांकनाचे उमटलेले पडसाद दैनिक ‘सनातन प्रभात’च्या मुंबई आवृत्तीच्या २५ व्या वर्धापनदिनाच्या या विशेष लेखमालेद्वारे दिले आहेत.

इतिहासातून युवा पिढी घडते; परंतु मुसलमानधार्जिण्या काँग्रेसने इतिहासाचे विकृतीकरण करून राष्ट्रघात चालवला होता आणि युवकांमध्ये हिंदूंचा पराभूत इतिहास शिकवला. वर्ष २००७ मध्ये ‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या (राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या) नवीन अभ्यासक्रमात इतिहासाच्या १० वीच्या पुस्तकात भारतावर आक्रमण करणार्‍या क्रूरकर्मा मोगलांचे उदात्तीकरण करण्यात आले होते. देशातील लाखो विद्यार्थ्यांना विकृत इतिहास शिकवला जात होता. दैनिक ‘सनातन प्रभात ने याला वाचा फोडली. सलग २ मास ‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या इतिहासाच्या पुस्तकातील विकृत इतिहासाची पोलखोल केली आणि भारतीय राष्ट्रपुरुषांचा इतिहास प्रसिद्ध केला.  

एन्.सी.ई.आर्.टी.

१. महाराष्ट्रात जनआंदोलन उभे राहिले !

महाराष्ट्रातही ‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या इयत्ता ७ वीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातही मोगलांचे उदात्तीकरण करण्यात आले होते. या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास केवळ ४ ओळींमध्ये देण्यात आला होता. हा प्रकारही दैनिक ‘सनातन प्रभात’ने उघड केला. यामुळे ‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या विरोधात देशभर संतापाची लाट उसळली. महाराष्ट्रात हिंदु जनजागृती समिती, वारकरी संप्रदाय यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आंदोलन उभे केले. वर्ष २००९ मध्ये शिवसेना आणि भाजप युतीच्या आमदारांनी नागपूर विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या वेळी पायर्‍यांवर आंदोलन करून अभ्यासक्रम पालटण्याची मागणी केली.

श्री. प्रीतम नाचणकर

२. राष्ट्रपुरुषांच्या इतिहासाचा पाठ्यपुस्तकात समावेश !

कालांतराने या विकृत इतिहासाविरोधातील संतापाची लाट देशभर पसरली. वर्ष २०१४ मध्ये केंद्रामध्ये भाजपची सत्ता आली. त्यानंतरही दैनिक ‘सनातन प्रभात’ने हा विषय लावून धरला. वर्ष २०१८ मध्ये केंद्रशासनाने याविषयीचा निर्णय घेऊन इयत्ता ७ वीच्या पाठ्यपुस्तकात छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास १०० शब्दांनी वाढवला, तर महाराणा प्रताप आणि अन्य पराक्रमी हिंदु राजांना इतिहासाच्या पुस्तकात स्थान दिले. गोव्यातील इतिहासाच्या पुस्तकांमध्येही शासनाने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे प्रत्येकी ५ पानांचे धडे पाठ्यपुस्तकांत समाविष्ट केले.

यामुळे देशातील कोट्यवधी विद्यार्थ्यांपर्यंत राष्ट्रपुरुषांचा इतिहास पोचला आणि  राष्ट्राभिमान निर्माण होण्यास साहाय्य झाले. हे दैनिक ‘सनातन प्रभात’चे मोठे यश आहे.

– श्री. प्रीतम नाचणकर, विशेष प्रतिनिधी, दैनिक ‘सनातन प्रभात’, मुंबई. (१७.३.२०२५)