समाज, संस्कृती आणि संवाद यांची प्रवाही वाहक म्हणजे भाषा. भाषेच्या लिखित स्वरूपाला प्रत्यक्षात आणण्याचे साधन म्हणजे लिपी. भाषा आणि लिपी वेगळी हे पूर्णपणे ज्ञात असूनही ‘रोमी कोकणी’ला मराठीसह राजभाषेचा अधिकृत दर्जा देण्याची मागणी विचारवंत का बरे करत असतील ?
१. अक्षर आणि लिपी यांचा विकास
आपण जे बोलतो ते बोलल्यानंतर फार वेळ रहात नाही. जे जे नाशवंत, नाहीसे होणारे आहे त्याला आपण ‘क्षर’ म्हणतो. त्या मानाने अधिक काळ टिकणारे म्हणून आपण जे लिहितो त्याला ‘अक्षर’ (जे नाशवंत नाही, नाहीसे होत नाही), असे म्हणतात. आपण जे बोलतो, व्यक्त होतो ते टिकावे, ही इच्छा जागृत झाल्यापासून माणसाने त्यासाठी विविध पर्याय शोधले. दगडावर कोरणे हा त्यातील एक प्रकार. आपण जे बोलतो त्याला चिन्हे, चित्रे या स्वरूपात माणसाने कोरून ठेवायला प्रारंभ केला. त्याच्या सामूहिक विकासातून ‘चित्रलिपी’ सिद्ध झाली. लेखनतंत्र आणि लेखनकला कालानुरूप विकसित होत गेली. आपल्याकडे सिंधु संस्कृतीतील लिपी, वैदिक, ब्राह्मी, खरोष्टी, शारदा, नागरी अशा अनेक लिपी वेळोवेळी सिद्ध होत गेल्या. काही लुप्त झाल्या, तर काही परिवर्तित झाल्या. भाषा वेगवेगळ्या असल्या, तरी अतीप्राचीन काळी बहुलिखित लिपी ब्राह्मी होती. त्यातून पुढे भाषेला अधिकाधिक अनुकूल होतील, अशा लिपी विकसित झाल्या. लिपी विकसित होण्याला भाषांप्रमाणेच विविध पंथांतील तंत्रमार्गाचाही महत्त्वाचा वाटा आहे.
२. भाषेप्रमाणे संस्कृती पालटली जाणे
भाषा हे केवळ संवादापुरते मर्यादित माध्यम नाही. संस्कृती, विचार, भूगोल, इतिहास, संस्कार या सगळ्यांना आपल्यासमवेत घेऊन व्यक्त होत जाणारा प्रवाह म्हणजे भाषा. ज्या भाषेत आपण बोलतो, शिकतो त्यानुसार आपले विचार होत जातात, वागणूक तशी होते आणि संस्कृतीही तशीच घडत जाते. उदाहरणच द्यायचे झाल्यास पूर्वीच्या काळी जेव्हा इंग्रजी भाषा हे शिक्षणाचे माध्यम झाले नव्हते, तेव्हा चार लोक एकत्र बसून पाचव्या व्यक्तीविषयी बोलत असतील आणि अचानक ती व्यक्ती आली, तर सहज तोंडातून निघत असे ‘१०० वर्षे आयुष्य’ किंवा ‘देवासारखा आला, तुझ्याविषयीच बोलत होतो’. सध्या आता ‘थिंक ऑफ द डेव्हिल अँड डेव्हिल इज हिअर’ (सैतानाचा विचार केला आणि सैतान आला), असे वाक्य सहज तोंडात येते. सध्या आपण गोव्यातील गावांची नावे कशी उच्चारू लागलो आहोत ? माशेलला मार्शेल किंवा मार्सेला, केळशीला कुवेलेशीम आणि फोंडाला पोंदा. कोकणीत आडनावांच्या मागे ‘कार’ हा असलेला प्रत्यय मराठीतही जसाच्या तसा घेण्याचा आग्रह धरणारे विचारवंतही ‘फोंडाचे पोंदा’ होण्याला आक्षेप घेत नाहीत. ‘इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा असल्याने तिथे मूळ नावाप्रमाणे उच्चारण्याचा आग्रह धरू नये’, असे म्हणत आंग्लभाषेच्या ‘पोंदा’(खाली) जातात. गोवा सरकारने विशेषत: पर्यटन खात्याने गावांची नावे रोमन लिपीत देतांना सोबत देवनागरीतही ती व्यवस्थित लिहावीत, जेणेकरून गोव्याबाहेरील व्यक्ती जिला देवनागरी वाचता येते, ती तरी निदान त्या ग्रामनामाचा योग्य उच्चार करील.
३. देवनागरी लिपीचे महत्त्व
योग्य उच्चारण करण्यासाठी आणि शब्दाचा नेमका अर्थ व्यक्त होण्यासाठी प्रत्येक भाषेला स्वतंत्र अशी नैसर्गिक लिपीही विकसित होत गेली. आज बहुतेक संस्कृतोद्भव भाषांसाठी देवनागरी लिपी न्यूनाधिक फरकाने वापरली जाते. देवनागरी ही मराठी, हिंदी आणि कोकणी या भाषांसाठी नैसर्गिक अन् अत्यंत समर्पक लिपी आहे. असे नाही की, रोमन लिपीमध्ये या भाषा लिहिल्याच जाऊ शकत नाहीत; पण त्यात वाचनार्थ नेमका आणि नेटका उतरेलच, असे नाही. तशी इंग्रजी ही भाषा देवनागरीतही लिहिली जाऊ शकते; पण ती इंग्रजीची नैसर्गिक लिपी ठरत नाही. अर्थबोध होण्याऐवजी अर्थहानी होणेच अधिक संभवते.
४. ‘रोमी कोकणी’ला राजाश्रयाचा आग्रह का ?
कोकणी भाषा देवनागरीप्रमाणे रोमन, कन्नड, मल्याळम् आणि अरबी अशा लिपींमध्येही लिहिली जाऊ शकते; लिहिली जातेही; पण म्हणून गोव्यातही ते स्तोम माजू द्यायचे का ?, हा खरा प्रश्न आहे. कर्नाटकात आणि अन्य ठिकाणी रहाणार्यांना त्यांच्या स्थानिक लिपीतून कोकणी लिहावीशी वाटत असेल, तर त्यात काहीच गैर नाही; पण गोव्यात तसा आग्रह धरणे सर्वथैव चुकीचे आहे. गोव्यात कोकणीसाठी रोमन लिपीचा आग्रह ख्रिस्त्यांसाठी धरला जात असल्याचे सांगितले जाते; पण किती ख्रिस्ती रोमन लिपीतील कोकणी भाषा माध्यम म्हणून शिकतात ? मग तरीही ‘रोमी कोकणी’ला राजाश्रयाचा आग्रह का धरला जात अाहे ?
५. भाषेवरून वाद का निर्माण केला जात आहे ?
‘रोमी कोकणी’ नावाची वेगळी आणि स्वतंत्र भाषा नाही. आता तिला ‘किरिस्तावांची कोकणी’(ख्रिस्त्यांची कोकणी) आणि ‘कोकण्यांची कोकणी’ (हिंदूंची कोकणी), असा रंग द्यायचा असेल, तर तो भाग वेगळा ! काहीही झाले, तरी ‘रोमी कोकणी’ नावाची वेगळी भाषा नाही. रोमन लिपीत लिहिल्या जाणार्या कोकणीला राजभाषा करायचे असल्यास, मग अन्य लिपींनी काय घोडे मारले आहे ? जितक्या लिपींमधून कोकणी लिहिता येते, तितक्या लिपींसह कोकणी भाषेला राजभाषा करायचे का ? ही अशी वर्गवारी करून कुणाला वर्गसंघर्ष पेटत ठेवायचा आहे ? भौगोलिक, पांथिक अस्मिता ही लिपीच्या माध्यमातून वाढवत नेल्यास पुढील काळात यावरून भांडणे निश्चित होतील.
६. भाषेच्या वादामागील षड्यंत्र
कोकणी-मराठीच्या राजकीय बुद्धीबळाच्या पटावर पहिले प्यादे लेखक दामोदर मावजोंनी सरकवले. अंतर्विरोध असलेल्या त्यांच्या वक्तव्यातून पुढील चालींची कल्पना आली होती आणि आता ती प्रत्यक्षात येत आहे. राजभाषेच्या वादात राजलिपीचा वादही घुसडण्यात आला आहे. ‘मराठी राजभाषा करायची असल्यास ‘रोमी कोकणी’लाही तो दर्जा द्या; नाही तर अन्य कुणालाच नको’, अशी ही खेळी आहे. ‘सवत रंडकी व्हावी’; म्हणून स्वत:च्या नवर्याला मारण्यातून कुठल्याच भाषेचे काहीच भले होणार नाही. फावेल ते फक्त इंग्रजीचे !
– श्री. प्रसन्न शिवराम बर्वे, पणजी, गोवा.