– श्री. केतन पाटील, प्रयागराज

प्रयागराज, १२ फेब्रुवारी (वार्ता.) – कुंभमेळ्यात प्रथमच काश्मिरी हिंदू विस्थापित समाज संघटनेच्या वतीने काश्मिरी हिंदूंवरील अनन्वित अत्याचारांची भीषणता दर्शवणारे प्रदर्शन लावण्यात आले आहे. सेक्टर ८ मध्ये पद्म माधव मार्गावर हे प्रदर्शन लावण्यात आले आहे. विविध राज्यांत स्थायिक झालेली काश्मिरी हिंदु कुटुंबियांनी एकत्र येऊन हे प्रदर्शन लावले आले.
या प्रदर्शनाविषयी माहिती देतांना काश्मिरी हिंदू विस्थापित समाज संघटनेचे संस्थापक श्री. अश्वनी साधू म्हणाले, ‘‘काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन काश्मीरमध्ये व्हावे, यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा. काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अत्याचारांविषयी चर्चा होते; परंतु त्या पुढे जाऊन काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन व्हायला हवे. काश्मिरी हिंदू विविध राज्यांत जाऊन शिक्षण घेऊन त्यांचा उदरनिर्वाह करत आहेत. काश्मीरमधून विस्थापित होऊन आमची तिसरी पिढी मूळ भूमीमध्ये जाण्याची वाट पहात आहे. कुंभक्षेत्री आम्ही सहस्रो लोकांची भंडारा सेवा करणार आहोत. ७ वेळा नरसंहार होऊनही काश्मिरी हिंदूंचा वंश टिकून आहे, ही भगवंताची कृपाच आहे.’’
नोयडा येथून आलेल्या आंचल रैना या म्हणाल्या, ‘‘काश्मीरमधून विस्थापित झाल्यावर जम्मूमध्ये आम्हाला जागा मिळाली. तेव्हा असे वाटले की, आम्हाला नंतर पुन्हा काश्मीरमध्ये जाता येईल. ज्यांच्याकडे पैसेही नव्हते, त्यांना अनेक कष्टांतून जावे लागले. मुलांना शाळांमध्ये पाठवण्यासाठीही आम्हाला १ ते दीड वर्ष संघर्ष करावा लागला. अनेक वृद्ध व्यक्तींना सर्पदंश झाल्याने ते तेथेच मरण पावले. सद्य:स्थितीत प्रत्येक काश्मिरी हिंदू शिक्षण घेऊन स्वतःला सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न करत आहे.’’
या शिबिराच्या ठिकाणी नियमित यज्ञयाग आणि शिवाची उपासना, तसेच सामूहिक आरतीही केली जाते. संस्कृती जपून ठेवण्यासाठी तेथे विविध भागांतून आलेल्या विस्थापित काश्मिरी पंडितांच्या पुढच्या पिढीलाही काश्मिरी भाषेत विविध देवतांच्या आरत्या शिकवण्यात येत होत्या.