Woman Sexually Assaulted In Train : तमिळनाडूत रेल्वेने प्रवास करणार्‍या गर्भवती महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिला गाडीबाहेर ढकलले !

एका आरोपीला अटक

चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडूच्या तिरुपत्तूरच्या जोलारपेट्टईजवळ रेल्वेत ४ महिन्यांच्या गर्भवती महिलेचे लैंगिक शोषण झाल्याची घटना उघड झाली आहे. रेल्वेने प्रवास करत असलेल्या २ तरुणांनी हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे.

पीडित महिला आंध्रप्रदेशातील चित्तूर येथे जात होती. ही महिला ७ फेब्रुवारीला पहाटे रेल्वेच्या प्रसाधनगृहात जात असतांना दोघांनी तिला अडवले आणि अत्याचार केला. या वेळी तिने साहाय्यासाठी आरडाओरडा केला असता त्या २ तरुणांनी तिला वेल्लोर जिल्ह्यातील केव्ही कुप्पमजवळ रेल्वेतून खाली ढकलून दिले. यात या महिलेचा हात आणि पाय यांचा अस्थीभंग (फ्रॅक्चर) झाला आणि तिच्या डोक्याला दुखापत झाली. पुढील उपचारांसाठी तिलावेल्लोर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पोलिसांनी या घटनेप्रकरणी गुन्हा नोंदवून हेमराज नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे.

अण्णाद्रमुक पक्षाकडून राज्यातील द्रमुक सरकारवर टीका

‘ए.आय.ए.डी.एम्.के.’चे (‘ऑल इंडिया अण्णा द्रमुक’चे – अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम्चे, म्हणजे द्रविड प्रगती संघाचे) सरचिटणीस पलानीस्वामी यांनी या घटनेचा निषेध केला आहे. ते म्हणाले की, तमिळनाडूतील महिला रस्त्यावर सुरक्षितपणे चालू शकत नाहीत, शाळा, महाविद्यालये किंवा कामाच्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत आणि आता रेल्वेनेही प्रवास करू शकत नाहीत, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. अशा अत्याचारांच्या घटना, म्हणजे राज्य सरकारचे अपयश असून सरकारने दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करायला हवी.

संपादकीय भूमिका

  • तमिळनाडूतील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा ! या घटनेविषयी देशातील निधर्मीवादी राजकीय पक्ष तोंड का उघडत नाहीत ?
  • अशा गुन्हेगारांना फाशीची शिक्षा करा !