आयुक्तांचे ठेकेदारावर कारवाईचे आदेश
नवी मुंबई – नवी मुंबई पालिकेच्या ठेकेदाराकडून कामगारांना वेळेत वेतन न मिळाल्याने कामगारांनी पालिका मुख्यालयात धरणे आंदोलन केले. त्याची नोंद घेत आयुक्त कैलास शिंदे यांनी २ दिवसांत वेतन न देणार्या ठेकेदारावर कारवाईचे आदेश उपायुक्तांना दिले. नवी महानगरपालिकेच्या माध्यमातून ग्रंथालयाला मनुष्यबळ पुरवणार्या चामुंडाई एंटरप्राइजेस आस्थापनाच्या ठेकेदाराने संबंधित कर्मचार्यांना महिना उलटून १८ दिवस झाले, तरी वेतन दिले नाही. त्याने मागील काही महिन्यांपासून ८० कामगारांचे भविष्य निर्वाह निधीचे पैसेही संबंधित खात्यामध्ये भरलेले नाहीत. जानेवारी २०२३ पासून ठेकेदाराला कार्यादेश मिळालेले आहेत; पण तरीही त्याने वेळेत वेतन केलेले नाही, असा कामगारांचा आरोप आहे.
हर्षल इंटरप्राईजेस या उद्यानाच्या देखभाल दुरुस्ती करणार्या ठेकेदाराकडूनही कामगारांचे वेतन देण्यात आलेले नाही. फेब्रुवारी महिन्यात केवळ अर्धेच वेतन कामगारांना दिले आहे. समाज समता संघटनेच्या नेतृत्वाखाली उद्यान आणि ग्रंथालय यांच्या कर्मचार्यांनी पालिका उपायुक्त किसनराव पलांडे यांच्याकडे समस्या मांडली. पलांडे यांनी ठेकेदारांशी चर्चा केली, तसेच लवकरात लवकर वेतन करण्याचे आदेश दिले. उपायुक्तांच्या आश्वासनाने समाधान न झाल्याने कामगारांनी आयुक्तांकडे धाव घेऊन वेतनाविषयी समस्या मांडली. त्यावर आयुक्तांनी २ दिवसांत कामगारांचे सर्व प्रश्न सोडवण्याचे आदेश उपायुक्त पलांडे यांना दिले.
संपादकीय भूमिकावेतनाअभावी कामगारांवर आंदोलनाची वेळ येणे दुर्दैवी ! |