प्रयागराज कुंभपर्व २०२५
उत्तरप्रदेशाच्या समाजकल्याण मंत्रालयाच्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग
प्रयागराज : धर्माचरण करून जर आपण या महाकुंभात सहभागी झालो, तरच आपल्यात साधनेची प्रेरणा निर्माण होईल, असे वक्तव्य हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन केसरी यांनी केले. उत्तरप्रदेशाच्या समाजकल्याण मंत्रालयाद्वारे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. समाजकल्याण मंत्रालयाद्वारे श्रवणदोष असणार्या ३० सहस्र जणांना नि:शुल्क श्रवणयंत्र वाटण्यात येत आहेत. याकरिता महाकुंभक्षेत्रात एका शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी समाजकल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री श्री. संजयकुमार गोंड, महामंडलेश्वर स्वामी केशवदास महाराज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काशी येथील प्रांत प्रचारक श्री. रमेश यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

श्री. राजन केशरी यांनी उपस्थितांना हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची ओळख करून दिली. त्यानंतर धर्माचरणाची आवश्यकता, कुंभमेळ्याचे महत्त्व, देवळात दर्शन कसे घ्यावे, टिळा लावण्याचे महत्व यांविषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. हिंदु जनजागृती समिती गेल्या २४ वर्षांपासून राबवत असलेल्या ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ या मोहिमेविषयी जाणून घेतल्यावर उपस्थितांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी समितीच्या वतीने राज्यमंत्री श्री. संजयकुमार गोंड यांना समितीची माहिती पुस्तिका भेट देण्यात आली, तसेच महाकुंभ क्षेत्रात समितीकडून लावण्यात आलेल्या प्रदर्शनाला भेट देण्याचे निमंत्रणही देण्यात आले.